वाशिम : रिसोड तालुक्यातील चाकोली येथील गावचे पोलीसपाटील गोविंद भुजंगराव गरकळ यांनी १२ वर्षांच्या अल्पवयीन ओम जगदीश गरकळ या मुलाच्या हातावर छऱ्याच्या बंदुकीने प्राणघातक हल्ला करून त्यास गंभीर जखमी केल्याप्रकरणी आराेपीस अटक करण्याच्या मागणीसाठी ओमच्या नातेवाईकांनी तहसील कार्यालयासमाेर उपाेषण मांडले हाेते. या उपाेषणाची आश्वासनाने सांगता करण्यात आली.
पाेलीसपाटील गोविंद भुजंगराव गरकळ यांनी जीव घेण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार जखमी ओम गरकळ यांच्या नातेवाईकांनी दिल्यानंतर पोलीस स्टेशन रिसोडद्वारे मात्र त्याच्यावर कलम भादंविच्या कलम ३२४ नोंद केली असून, त्यांच्यावर ३०७ अन्य कालमान्वये नोंद होऊन त्यांना तात्काळ अटक होणे आवश्यक आहे. मात्र रिसोड पोलीस स्टेशन, रिसोडमार्फत या कामात दिरंगाई होत असून, हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप तक्रारकर्ते नातेवाईकांनी केला आहे. पोलीसपाटील गोविंद भुजंगराव गरकळ यांच्यावर तात्काळ कलम ३०७ भादंवि व अन्य कालमान्वये कठोर कायदेशीर कारवाई करून त्यांना अटक करावी व त्यांचे पोलीसपाटील पद रद्द करावे, यासाठी आम्ही ओम गरकळ यांचे नातेवाईक उपोषणाला बसले हाेते, परंतु उपोषणाच्या पहिल्यादिवशी रिसोडचे ठाणेदार एस. एम. जाधव, नायब तहसीलदार यांनी रितसर कारवाई करण्याचे तोंडी आश्वासन देत आमचे उपोषण सोडले आहे. या उपोषणाला शिवसंग्राम जिल्हाध्यक्ष प्रा. प्रशांत पाटील-गोळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत.