वाशिम : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या दोनदिवसीय तालुकास्तरीय आढावा दौऱ्याचा समारोप वाशिम येथील पंचायत समिती सभागृहात १४ ऑगस्ट रोजी करण्यात आला.
१३ ऑगस्ट रोजी रिसोड, मालेगाव व कारंजा तालुक्यांतील पदाधिकाऱ्यांचा आढावा घेण्यात आला, तर १४ ऑगस्ट रोजी मानोरा, मंगरूळपीर व वाशिम तालुक्यांतील पदाधिकारी व सर्व सेलचा आढावा घेण्यात आला. यावेळी पक्ष निरीक्षक डॉ. संजय रोडगे म्हणाले की, वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची पकड मजबूत आहे. शहरी भागात पाहिजे तेवढा प्रभाव दिसून येत नाही. त्यासाठी आपापसातील गटतट बाजूला सारून जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद कशी वाढेल यासाठी सर्वांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत. केवळ पदापुरते काम करू नका, आपापल्या तालुक्यातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या शोधून त्या मार्गी लावा. जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे म्हणाले की, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जनतेच्या प्रश्नावर लढण्यासाठी सदैव तत्पर राहून पक्षासाठी निष्ठेने काम करावे. आता आपल्याला बदलावे लागेल, शिस्त व नियोजनपूर्वक कामातून पक्षाची ताकद वाढवावी लागेल. आपल्या पदाचा पक्षाला व जनतेला कसा फायदा होईल, यासाठी सजग राहून विविध उपक्रम राबविण्याचे नियोजन करावे, अशा सूचनाही ठाकरे यांनी दिल्या.
या आढावा दौऱ्यात संबंधित तालुक्याचे तालुकाप्रमुख व सर्व सेलच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या नियुक्तीपासून काय काय कार्ये केलीत याचा सविस्तर अहवाल जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे व पक्ष निरीक्षक डॉ. संजय रोडगे यांच्यासमोर सादर केला.
०००००००००००००
मान्यवरांची उपस्थिती
या दोनदिवसीय आढावा दौऱ्यात पक्ष निरीक्षक डॉ. संजय रोडगे, विभागीय महिला निरीक्षक निकम ताई, महिला निरीक्षक देशमुख ताई, सामाजिक न्यायचे जिल्हाध्यक्ष विनोद पट्टेबहादूर, महिला जिल्हाध्यक्ष शुभदा नायक, युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद चौधरी, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष पवन राऊत, युवती जिल्हाध्यक्ष नूतन राठोड आदींची आढावा दौऱ्यात प्रमुख उपस्थिती होती.