यंदाच्या पावसाळ्यात सततच्या पावसामुळे शेतकरी, ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यात काजळेश्वर येथील तीन घरांची ऑगस्ट महिन्यात पडझड झाली होती. त्यातच काजळेश्वर येथील अनेक शेतकऱ्यांची शेती असलेल्या काजळेश्वर-पानगव्हाण मार्गादरम्यानच्या नाल्यावरील पूल अतिवृष्टीमुळे वाहून गेला होता. यामुळे दोन्ही गावांचा संपर्कच तीन दिवस तुटला होता. पाणी ओसरल्यानंंतर नाल्यातून वाहतूक आणि ग्रामस्थांची ये-जा सुरू झाली. तथापि, हा तात्पुरता आणि अडचणीचा पर्याय असल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांकडून पुलाच्या दुरुस्तीची मागणी करण्यात येत होती. तथापि, तीन महिने उलटले तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाच्या दुरुस्तीची तसदी घेतली नाही.
---------
काजळेश्वर ते पानगव्हाण रोडची दुर्दशा
काजळेश्वर ते पाणगव्हाण या ३ किलोमीटर अंतराच्या रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. डांबरीकरण नाहीसे झाले असून, खडी उघडी पडून रस्त्यावर मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत. यामुळे रस्त्यावरून वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागते. यातून एखादवेळी अपघाताची भीती असल्याने या रस्त्याचे नूतनीकरण करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत. काजळेश्वर येथील अनेक शेतकऱ्यांची शेतजमीन पानगव्हाण शेत शिवारात असून, या रस्त्यावरूनच पानगव्हाण येथील ग्रामस्थ काजळेश्वर येथे ये-जा करीत असतात. यात शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचाही प्रवास होतो.
-----------