काही महिन्यांपूर्वी उंबर्डा बाजार-वहीतखेड या जवळपास पाच किलोमीटर अंतराच्या डांबरी मार्गाची डागडुजी झाली आहे, मात्र या मार्गाचे काम होत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले. त्यामुळे हा मार्ग ठिकठिकाणी उखडल्याने या रस्त्यावर पायी चालणेही कठीण झाले आहे. विशेष म्हणजे उंबर्डा बाजार-वहीतखेड या दरम्यान असलेल्या हनुमान मंदिराजवळील पुलाजवळच्या अर्धा किलोमीटर रस्त्याची चाळणी झाली असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गिट्टी उघडी पडली असून, या भागात अनेक वेळा किरकोळ अपघात झाले असून, अनेक दुचाकी वाहनचालकांना गंभीर दुखापती झाल्या आहेत.
-----------------------------
अवघ्या पाच महिन्यांत दुर्दशा
उंबर्डा बाजार-वहितखेड या मार्गाची पाच महिन्यांपूर्वीच डागडुजी झाली आहे. यासाठी शासनाचा मोठा निधीही खर्च झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या या मार्गाची डागडुजी व्यवस्थित आणि योग्यरीत्या होणे अपेक्षित होते, परंतु त्याकडे बांधकाम विभागाने लक्ष दिले नाही. त्यामुळे या मार्गाचे काम म्हणावे तेवढे चांगले झाले नाही, परिणामी पाचच महिन्यांत या मार्गाची दुर्दशा झाली आहे.