वाशिम शहरातील विस्कळीत वाहतूकीवर काँग्रेस आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 12:52 PM2018-09-05T12:52:48+5:302018-09-05T12:53:13+5:30
काँग्रेसचे पदाधिकारी आक्रमक झाले असून या संदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून वाहतूक सुरळीत न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शहरातील वाहतूक व्यवस्था अंत्यत विस्कळीत झालेली असून वाहतूक शाखेचे कर्मचारी शहरामध्ये कुठेही कर्तव्य बजावत नसून त्या उलट शहराच्या बाहेर पावत्या फाडण्याचे काम करीत आहेत. यावर काँग्रेसचे पदाधिकारी आक्रमक झाले असून या संदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून वाहतूक सुरळीत न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.
जिल्हाधिकारी यांना जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष दिलीपराव सरनाईक, शहराध्यक्ष शंकर वानखडे यांच्या मार्गदर्शनात निवेदन सादर करण्यात आले, त्यानुसार शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी शहराबाहेर पावत्या फाडून फक्त वसुलीचे केंद्र बनले आहे की काय असा प्रश्न पडला आहे. शहरातील प्रमुख व वर्दळीच्या ठिकाणी एकही वाहतूक शाखेचा कर्मचारी आढळत नसल्याने शहरातील प्रमुख चौकामध्ये अस्ताव्यस्त वाहतूुकीचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा या कारणावरुन वाद उदभवत आहेत. तसेच जड वाहतूक सुध्दा दिवसभर शहरामधून सर्रास होतांना दिसून येत आहे. सकाळी १०.३० ते ११.३० व संध्याकाळी ४.३० ते ५.३० ही वेळ कार्यालय व शाळांची वेळ आहे. यावेळी वाहतुकीबाबत सतर्कता पाळणे गरजेचे आहे. एकंदरीत सर्व परिस्थिती पाहता वाशिम शहरातील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे. या सर्व परिस्थितीला वाहतूक व्यवस्थेचे अधिकारी व कर्मचारी जबाबदार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यासंदर्भात योग्य निर्णय घेवून चौकशी करुन दोषिंवर कार्यवाही व वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याचा प्रयत्न करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदनावर राजु नामदेवराव वानखडे, समाधान माने, वाय.के. इंगोले, डॉ. विशाल सोमटकर, किसनराव मस्के, वाशिम पंचायत समितीचे सभापती गजाननराव भोने, प्रल्हादराव उलेमाले, दिपकराव भांदुर्गे, किशोर पेंढारकर, श्यामभाऊ उफाडे, अर्जुन उदगिरे, सुभाष देवहंस, नामदेव मापारी, प्रमोद भवाळकर, परशराम भोयर, शे.ख्वाजा शे.आगा, अॅड. अमोल सोमाणी, ईस्माईल इमाम नौरंगाबादी, संदीप वानखडे, रुपेश भोसले आदिंच्या स्वाक्षºया आहेत.