लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी पूर्णत: फसवी असून कर्जमाफीमधील अटी शिथिल कराव्या व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, या मागणीसाठी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी २४ जुलै रोजी येथे धरणे आंदोलन केले.सरकारने शेतकऱ्यांना जी कर्जमाफी दिली, त्यात त्यात अनेक जाचक अटी लादण्यात आल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणे कठीण झाले आहे. कर्जमाफीचा फक्त प्रचारच केला जात असून, अमंलबजावणीत मात्र कमालीची तफावत दिसून येत आहे. त्यामुळे कर्जमाफीच्या जाचक अटी दूर करुन विनाशर्त कर्जमाफी देण्यात यावी, ३० जून २०१७ पर्यंतच्या सर्व थकबाकीदारांचा त्यात समावेश असावा, शेतीपूरक व जमीन सुधारणेसाठी घेतलेले कर्ज तसेच शेती अवजारासाठी घेतलेल्या कर्जाची माफी व्हायला हवी, मत्स्यपालन, कुक्कुटपालन, शेळीपालन, रेशीम उद्योग, टॅक्टर, विहीर खोदणे, पाइपलाइन, शेडनेट, पॉली हाउस आदींचेही कर्ज माफ करावे, पुर्नगठीत कर्जधारकांना प्रोत्साहन नव्हे; तर त्यांचे पूर्ण कर्ज माफ करावे, नगर बँका, पतसंस्था व मायक्रो फायनान्सकडून घेतलेल्या कर्जाची माफी झाली पाहिजे, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. जिल्हाध्यक्ष अॅड.दिलीपराव सरनाईक यांच्या नेतृत्वामध्ये झालेल्या या आंदोलनात माजी खासदार अनंतराव देशमुख, माजी आमदार किसनराव गवळी, राजू चौधरी, दिलीप देशमुख, चक्रधर गोटे, गजानन भोने, किसनराव मस्के, राजू वानखडे, गजानन देवळे, परशराम भोयर, शंकर वानखडे, अॅड.पी.पी. अंभोरे, वाय.के.इंगोले, प्रा.अब्रार मिर्झा, श्याम उफाडे, विशाल सोमटकर व असंख्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला.
कर्जमाफीच्या मुद्यावरून काँग्रेसने दिले धरणे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 2:02 AM