सुनील काकडे । लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कधीकाळी जिल्ह्याच्या राजकारणात क्रमांक एकची भूमिका पार पाडलेल्या काँग्रेस पक्षाला सध्या उतरती कळा लागली असून, पदाधिकारी व कार्यकर्ते शांत आहेत. गतवैभव प्राप्त करण्यासाठी नेत्यांसह कार्यकर्त्यांना मरगळ झटकून कामाला लागावे लागणार आहे. माजी मंत्री बाबासाहेब धाबेकर, माजी खासदार अनंतराव देशमुख आदी मातब्बर नेत्यांच्या काळात काँग्रेस पक्षाला सुगीचे दिवस होते. जिल्हा परिषदेसह पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगर परिषदा, विविध सहकारी सोसायट्या पक्षाच्या ताब्यात होत्या; मात्र अंतर्गत गटबाजी आणि एकमेकांवर कुरघोडीच्या नादात अनेक ग्रामपंचायती आणि नगर परिषदांमध्ये पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. वाशिम जिल्हा परिषद आजही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे. वाशिम, कारंजा आणि मानोरा या तीन पंचायत समित्यांमध्येही काँग्रेसचे सभापती विराजमान आहेत; परंतु पक्षाची स्थिती मात्र समाधानकारक नाही. सध्याची बदललेली राजकीय स्थिती आणि भारतीय जनता पक्षाच्या वाढत चाललेल्या ताकदीमुळे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्येही पुन्हा एकवेळ काँग्रेस-रा.काँ.ला सत्ता काबीज करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे, असे मत राजकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे. दरम्यान, राजकीय क्षेत्रात काँग्रेस सातत्याने पिछाडीवर जात असल्याच्या मुद्यावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप सरनाईक यांना छेडले असता, आजही ग्रामीण भागातील राजकारणात काँग्रेस नंबर वनच असल्याचा दावा त्यांनी केला. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्कलनिहाय दौरे केले जाणार असून, पुन्हा एक वेळ काँग्रेस पूर्ण ताकदीने समोर येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तीन नगर परिषदांमध्ये काँग्रेसचे केवळ तीन सदस्य!नोव्हेंबर २०१६ मध्ये वाशिम, कारंजा आणि मंगरूळपीर या तीन नगर परिषदांच्या निवडणुका पार पडल्या. वाशिममध्ये दोन आणि मंगरूळपीरात एक अशा केवळ तीन जागांवर काँग्रेस पक्षाला विजय मिळविता आला; कारंजात नगर परिषदेत तर खातेही उघडता आले नाही. वास्तविक पाहता नगर परिषद निवडणुकांमधील या मोठ्या अपयशानंतर पक्षातील ज्येष्ठ-श्रेष्ठ नेते, विद्यमान जिल्हाध्यक्ष तथा दिग्गज पदाधिकाऱ्यांनी खडबडून जागे होत पराभवाची कारणे शोधून त्या दिशेने स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्न करायला हवा होता; मात्र गेल्या आठ महिन्यांचा मोठा कालावधी उलटूनही ही मंडळी अद्याप शांत आहे.
जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला उतरती कळा!
By admin | Published: July 12, 2017 1:36 AM