‘त्या’ नोटीसप्रकरणी काॅंग्रेसचे वाशिमात आंदोलन
By संतोष वानखडे | Published: March 30, 2024 03:56 PM2024-03-30T15:56:39+5:302024-03-30T15:57:17+5:30
या निवेदनानुसार, इन्कम टॅक्सच्या नावाखाली काॅंग्रेस पक्षाची आर्थिक कोंडी केली जात आहे. लोकसभा निवडणुका होत असताना, काॅंग्रेस पक्षाची बॅंक खाती गोठवली आहेत आणि आता १८०० कोटी रुपयांचा दंड भरण्याची नोटीस पाठवली आहे.
वाशिम : आयकर विभागाने अगोदर काॅंग्रेस पक्षाची बॅंक खाती गोठवली आणि आता १८०० कोटी रुपयांचा दंड भरण्याची नोटीस पाठविली. याविरोधात काॅंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ३० मार्च रोजी आंदोलन करीत निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
या निवेदनानुसार, इन्कम टॅक्सच्या नावाखाली काॅंग्रेस पक्षाची आर्थिक कोंडी केली जात आहे. लोकसभा निवडणुका होत असताना, काॅंग्रेस पक्षाची बॅंक खाती गोठवली आहेत आणि आता १८०० कोटी रुपयांचा दंड भरण्याची नोटीस पाठवली आहे. केंद्रातील सरकारची ही कारवाई काॅंग्रेस पक्षाची लोकसभा निवडणूक आर्थिक संकटात टाकणारी, नि:पक्ष व मोकळ्या वातावरणात निवडणुका लढवण्याच्या तत्वाला बाधा पोहोचविणार आहे, असा आरोपही काॅंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार अमित झनक, जि.प. उपाध्यक्ष चक्रधर गोटे, काॅंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप देशमुख, वाशिम पंचायत समितीचे उपसभापती गजानन गोटे, ॲड. पी.पी. अंभोरे, सुरेश राठोड, राजेश गोटे, सागर खरबळकर, संदीप खराटे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती.