वाशिम : अदानी समूहाच्या कथित घोटाळ्याबद्दल काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे, शेतकरीविरोधी तीन कायदे, पीक विमा यांसह अन्य ज्वलंत प्रश्नांवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तरे द्यावीत, अशी एकमुखी मागणी काॅंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी १७ एप्रिल रोजी केली. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काॅंग्रेसने पुकारलेल्या ‘मोदीजी जवाब दो’ आंदोलनात शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.देशात अराजक व हुकुमशाहीसदृश परिस्थिती असल्याचा आरोप करीत काॅंग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत ‘जवाब दो’ आंदोलन केले. अदानी समूहाच्या घोटाळ्याबद्दल राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे पंतप्रधान मोदी यांनी द्यावी, शेतकऱ्यांसाठी धोकादायक ठरलेले तीन कायदे आणि हे कायदे परत घेण्यासाठी आंदोलन करताना शहीद झालेल्या ७५० पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण?, पीक विम्याच्या नावाखाली अदानी-अंबानीसाठी अन्नदात्याचा बळी घेणारे व जनतेची तिजोरी लुटून देणारे कोण?, माजी राज्यपाल सतपाल मलिक यांनी सन २०१९ मध्ये घडलेल्या पुलवामा हल्ल्याबाबत व त्यामध्ये शहीद झालेल्या जवानांबाबत केलेल्या वक्तव्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टिकरणासह उत्तर द्यावे, अशी मागणी काॅंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. या आंदोलनात काॅंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष आमदार अमित झनक, प्रदेश सरचिटणीस ॲड. दिलीपराव सरनाईक, दिलीप भोजराज, बलदेव राठोड, जि.प. उपाध्यक्ष चक्रधर गोटे, डाॅ. शाम गाभणे, किसनराव मस्के, गजानन गोटे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.