वाशिम
वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अखेर काॅंग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे) व वंचित बहुजन आघाडीची महायुती ४ एप्रिल रोजी साकारली असून, तशी घोषणाही तिन्ही पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी केली.
सहकार क्षेत्रात कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीला विशेष महत्व आहे. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीवर काॅंग्रेसचे दिवंगत नेते स्व. नारायणराव गोटे यांच्या गटाची सर्वाधिक काळ सत्ता होती. बाजार समितीचा विहित कार्यकाळ संपल्यानंतरही कोरोनामुळे निवडणूका लांबणीवर पडल्या होत्या. आता २८ एप्रिल रोजी बाजार समित्यांची सार्वत्रिक निवडणूक होत असून, यामुळे सहकार क्षेत्रातील राजकारण ढवळून निघत आहे. बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडी साकारण्यासाठी स्थानिक नेत्यांनी मतदार, कार्यकर्त्यांची मते विचारात घेत युतीसाठी बोलणी चालविली होती. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत काॅंग्रेस, शिवसेना (ठाकरे) व वंचित बहुजन आघाडीची महायुती साकारली असून, ४ एप्रिल रोजी काॅंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद उपाध्यक्ष चक्रधर गोटे, शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) जिल्हा प्रमुख डाॅ. सुधीर कवर व वंचित बहुजन आघाडीचे पश्चिम विदर्भ प्रमुख डाॅ. सिद्धार्थ देवळे यांनी या महायुतीची अधिकृत घोषणा केली. या महायुतीमुळे प्रतिस्पर्धी गटाच्या भूवया उंचावल्या असून, ते महायुतीचे आव्हान कसे पेलतात? याकडे राजकीय क्षेत्रासह सहकार गटाचे लक्ष लागून आहे.‘त्या’ इच्छूक उमेदवारांची गोची?वाशिम बाजार समितीच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी, शिवसेनेच्या (ठाकरे) काही इच्छूक उमेदवारांनी महायुतीऐवजी प्रतिस्पर्धी गटाकडून उमेदवारी अर्ज भरले आहेत. आता मंगळवारी (दि.४) काॅंग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे) व वंचित बहुजन आघाडीची महायुती झाल्याची अधिकृत घोषणा तिन्ही पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी केली. त्यामुळे प्रतिस्पर्धी गटाकडून अर्ज भरलेल्या वंचित बहुजन आघाडी, शिवसेनेच्या इच्छूकांची गोची झाल्याचे राजकीय गोटात बोलले जात आहे. पक्षाच्या निर्णयाशी एकनिष्ठ राहायचे की पक्षाच्या निर्णयाला आव्हान देत स्वपक्षीय उमेदवारांशीच दोन हात करायचे? याबाबत इच्छूक उमेदवार काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागून आहे.