लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गांची कामे पुढे पावसासह इतर कारणांनी अडचणीत येऊ नयेत म्हणून या मार्गावरील पुलांची उभारणी वेगाने करण्यात येत आहेत. जिल्ह्यात दोन महिन्यांपासून राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणच्यावतीने कंत्राटदारांमार्फत राष्ट्रीय महामार्गांचे काम सुरू करण्यात आले आहे. यामध्ये मंगरुळपीर-आर्णी, महान-मंगरुळपीर, वाशिम-मंगरुळपीर, कारंजा-मंगरुळपीर आदि मार्गांचा समावेश आहे. या मार्गावर असलेल्या लहान, मोठ्या पुलांच्या कामांना प्राधान्य देण्यात येत आहे. ही कामे दोन वर्षे चालणार आहेत. त्यामुळे पुढे पावसाने अडचणी येऊ शकतात, तसेच हे सर्व मार्ग सिमेंट काँक्रीटचे होणार असल्याने समतलीकरण महत्त्वाचे आहे. ही बाब लक्षात घेऊन पुलांच्या कामांना प्राधान्य देण्यात येत आहे. या कामांमुळे वाहनधारकांना अडचणी येऊ नयेत म्हणून पुलांचे काम सुरू असलेल्या ठिकाणी वळणमार्गही तयार करण्यात आले आहेत. यामुळे वाहनधारकांच्या अडचणी दूर झाल्या आहेत. दरम्यान, या मार्गाच्या समतलीकरणासाठी मुरुमाची दबाई करताना पाण्याचा वापर होत नाही, तसेच मुरूम माती मिश्रीत असल्याने यातील धुळ मोठ्या प्रमाणात उडून वाहनधारकांना त्याचा त्रास होत आहे, तसेच शेतशिवारातील पिकांवरही धूळ बसत असल्याने पिके सुकत असल्याचे दिसत आहे.
महामार्गावरील पुलांची उभारणी वेगाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2018 5:35 PM