-----------
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे चालकांची कसरत
वाशिम : येथील निर्माणाधीन उड्डाणपुलाच्या बाजूला असलेल्या दोन्ही रस्त्यांची अवस्था वाईट झाली आहे. यावर मोठमोठे खड्डे पडले असून, या खड्ड्यांत पावसाचे पाणी साचून गटारे झाली आहेत. त्यामुळे या रस्त्यावर वाहने चालविताना चालकांची मोठी कसरत होत असल्याचे चित्र दरदिवशी पाहायला मिळत आहे.
^^^^^^^^^^
गावकऱ्यांना स्वच्छतेबाबत मार्गदर्शन
वाशिम : कारंजा तालुक्यातील उंबर्डा बाजारासह विविध गावांत रस्त्यावर कचरा टाकण्यात येत असल्याने गावात घाण वाढत आहे. या पृष्ठभूमीवर सरपंचांच्या मार्गदर्शनात ग्रामसचिव व आरोग्य कर्मचारी सभा घेऊन स्वच्छता राखण्याबाबत मार्गदर्शन करीत आहेत.
-----------
एटीएम मशीनची दुरवस्था
वाशिम : जिल्ह्यातील विविध बँकांचे काही एटीएम अनेक दिवसांपासून बंद आहेत. त्यात मंगरूळपीर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेलगतच असलेल्या एटीएम मशीनची दुरवस्था झाल्याचे मंगळवारी दिसून आले.
---------------
महामार्गाच्या नवनिर्मित पुलावर डबके
वाशिम : राष्ट्रीय महामार्गावर मंगरूळपीर तालुक्यातील शेलूबाजार ते चिखलीदरम्यान लांभाडे यांच्या शेताजवळच्या पुलावर पावसाच्या पाण्याचे डबके साचले आहे. त्यामुळे चालकांना अशी कसरत करावी लागत आहे.
^^^^^
बँक खात्याअभावी शिष्यवृत्ती मिळेना !
वाशिम : विविध योजनांत पात्र विद्यार्थ्यांना समाजकल्याण विभागातर्फे शिष्यवृत्ती दिली जाते. तथापि, अचूक बँक खाते क्रमांक नसल्याने शिष्यवृत्ती रखडली. अचूक बँक खाते क्रमांक पाठविण्याचे आवाहन समाजकल्याण अधिकाऱ्यांनी गुरुवारी केले.
-------------
वृद्ध कलावंतांचे मानधन रखडले
वाशिम : जिल्ह्यातील वृद्ध कलावंतांनी मानधन मिळण्यासाठी सादर केलेले प्रस्ताव प्रशासकीय पातळीवर प्रलंबित आहेत. याकडे लक्ष पुरवून प्रस्ताव निकाली काढावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी २७ जुलै रोजी समाजकल्याण विभागाकडे केली.
---------
रिक्त पदांमुळे आरोग्य सेवा प्रभावित
वाशिम : मालेगाव तालुक्यात मेडशीसह इतर काही ठिकाणी आरोग्याधिकारी, कर्मचाऱ्यांची ३५ पेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. यामुळे आरोग्य सेवा प्रभावित होत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी शेख गणीभाई मित्रमंडळाने मंगळवारी केली.
------------------
महिलांना मार्गदर्शन
वाशिम : महिला आणि बालविकास विभागाच्या वतीने अंगणवाडी केंद्रात मंगळवारी महिलांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होेते. या कार्यक्रमात मातांना पोषण आहाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
------------
पावसामुळे भाजीपाला पिकांचे नुकसान
वाशिम : कारंजा तालुक्यातील धामणी खडी परिसरात शुक्रवारी आलेल्या जोरदार पावसामुळे फळपिकांसह भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे शेतकरी हताश झाला आहे.
^^^^^^^^^^
शिक्षकांच्या विविध मागण्या प्रलंबित
वाशिम : अनुदान, जुनी पेन्शन योजना यांसह शिक्षण संस्था आणि शिक्षकांच्या विविध मागण्या अद्याप प्रलंबित आहेत. सदर मागण्या निकाली काढण्याची मागणी जुन्या पेन्शन योजनेपासून वंचित शिक्षकांनी २७ जुलै रोजी केली.
------------
रस्त्याअभावी शेतकऱ्यांची गैरसोय
वाशिम : रिसोड तालुक्यातील महागाव ते रत्नापूर मारमाळ पाणंद रस्ता नसणे, महागाव ते सोनाटी शिवपर्यंत खडीकरण नसल्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. खरीप हंगामात यामुळे अनेक अडचणी उद्भवत असल्याने संबंधित विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी पंचायत समितीच्या सदस्यांनी केली आहे.
^^^^^^^^^