लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन : मालेगाव तालुका दुय्यम निबंधक कार्यालयासाठी शिरपूर येथे नवीन इमारत बांधकाम करण्यात आले. मात्र, केवळ दोन बाजूच्या आवार भिंतीसाठी निधी नसल्याने या इमारतीचा लोकार्पण सोहळा गत वर्षभरापासून रखडला आहे.मालेगाव तालुका दुय्यम निबंधक कार्यालय शिरपूर येथे भाडेतत्त्वावरील इमारतीत सुरू आहे. स्वतंत्र जागा व इमारत नसल्याने साधारणत: चार वर्षांपूर्वी हा प्रश्न निकाली काढण्यात आला. इमारत बांधकामासाठी एक कोटी रुपयांचा निधी मिळाला होता. एका वर्षापूर्वी इमारत बांधकाम पूर्ण झाले आहे. केवळ दोन बाजूच्या आवार भिंतीसाठी निधी नसल्याने या इमारतीचा लोकार्पण सोहळा रखडला आहे. या इमारतीच्या आजूबाजूचा परिसर सध्या ‘गोदरी’ बनला असल्याचे दिसून येते. परिसरातील नागरिक या इमारतीच्या आडोशाने सकाळचा प्रात:विधी याच परिसरात उरकत असल्याने येथे दुर्गंधीचे साम्राज्य पसरत आहे.
दुय्यम निबंधक कार्यालय इमारत परिसरात संरक्षण भिंतीसाठी निधी मिळावा, यासाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठविला आहे. सदर प्रस्ताव अद्याप मंजूर नाही. प्रस्तावाला मान्यता मिळताच व निधी उपलब्ध होताच, उर्वरीत कामाला सुरूवात होईल.- श्रीधर जोगदंड, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, मालेगाव