गतवर्षी दमदार पाऊस झाल्याने सर्व धरणे, पाझरतलाव भरले व नद्या-नाले काठोकाठ भरले. सिंचनासाठी मुबलक पाणी मिळाल्याने रब्बी पिकेही जोमदार आहेत. यामुळे बाजारपेठ गजबजून जाण्याची अपेक्षा होती; परंतु फेब्रुवारी महिना उलटत आला तरी, शेलुच्या बाजारपेठेत ग्राहकांची संख्या वाढलीच नाही. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावानंतर ४० खेडी जोडलेली ही बाजारपेठ पूर्णपणे मंदावली आहे. प्रत्यक्षात जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या शेलूबाजारच्या आठवडी बाजारात यात्रोत्सवांच्या काळात हिवाळ्याच्या मध्यंतरानंतर मोठी गर्दी पाहायला मिळते. येथील आठवडी बाजारात होणाऱ्या गर्दीमुळे बाजारकरूंना चालताही येत नाही; परंतु दर बुधवारी भरणारा हा आठवडी बाजारही ओस पडत असल्याचे दिसते. या ठिकाणी अगदी बोटावर मोजण्याएवढेच ग्राहक रस्त्याने ये-जा करीत असल्याचे चित्र दिसते. दरम्यान, गतवर्षी ऐन लग्नसराईच्या काळात कोरोना संसर्गावर नियंत्रणासाठी लॉकडाऊन सुरू करण्यात आले होते. त्यामुळे अनेक वधू-वर पित्यांनी लग्न सोहळे रद्द केले होते, तर काही वधू-वर पित्यांनी चोरून लपूनच छोटेखानी सोहळ्यात आपल्या मुलामुलींचे लग्न उरकून घेतले; परंतु आता लग्नासाठी पुरेशी मुभा असतानाही लग्नाच्या खरेदीसाठी गर्दी आढळून येत नाही.
--------------------
ऑनलाइन व्यवहारांचा परिणाम
मागील काही महिन्यांपासून इलेक्ट्रॉनिक वस्तू, कापड, पादत्राणे, मोबाइल अॅसेसरीजच्या ऑनलाइन खरेदीवर बहुतेकांचा भर आहे. शेलूबाजार परिसरात कोरोना लॉकडाऊनच्या काळापूर्वीपासूनच ऑनलाइन खरेदीकडे कल वाढला आहे. त्यात बड्या कंपन्यांनी उत्पादक ते ग्राहक अशी थेट व्यवस्था ऑनलाइनच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली असून, यात ग्राहकांना बाजारपेक्षा कमी दरात विविध वस्तू मिळतात. त्यातच लॉकडाऊनच्या काळात ग्रामीण भागांत अनेकांनी फिरते व्यवसाय सुरू केले आहेत. यात ग्राहकांना प्रत्येकच वस्तू घरपोच मिळत असल्याने बाजारपेठेत येण्यास ग्राहक उदासीन आहेत. त्याचा परिणाम बाजारपेठेतील जवळपास सर्वच व्यवसायांवर झाला आहे.
===Photopath===
180221\18wsm_2_18022021_35.jpg
===Caption===
शेलूबाजार बाजारपेठेत ग्राहकसंख्या रोडावली