लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : बेकायदेशीर आॅनलाइन फार्मसीच्या माध्यमातून सुरू असलेल्या औषध विक्रीवर तत्काळ निर्बंध लादावे, या मुख्य मागणीसाठी ‘आॅल इंडिया आॅर्गनायझेशन आॅफ केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट’ने पुकारलेल्या देशव्यापी संपात जिल्हाभरातील ५५० औषध विक्रेत्यांनी सहभाग नोंदविला असून, आपापली दुकाने बंद ठेवली आहेत. या संपाला १०० टक्के प्रतिसाद मिळाल्याचा दावा येथील केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष राजेश पाटील यांनी केला आहे.सध्या सर्वत्र सुरू असलेल्या बेकायदेशीर आॅनलाइन फार्मसीच्या माध्यमातून नार्कोटिक्स, ड्रग्ज, झोपेची औषध, गर्भपाताच्या गोळ्या, कोडीन सिरप यासारख्या अनेक धोकादायक औषधींची विक्री केली जात असल्याचे अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने शासनाच्या वेळोवेळी निदर्शनास आणून दिले. मात्र, या गंभीर बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. यासह केंद्र शासनाच्या स्वास्थ्य व कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पब्लिक नोटिसलाही औषध विक्रेता संघटनेचा विरोध असल्याने ३० मे रोजी हा संप पुकारण्यात आला होता. या संपात जिल्ह्यातील सर्व औषध विक्रेते १०० टक्के सहभागी झाले होते, असा दावा संघटनेने केला. दरम्यान, रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून वाशिम शहरात १० मेडिकलमधून अत्यावश्यक परिस्थितीसाठी औषधे उपलब्ध करून देण्याची सोय करण्यात आली होती. औषध विक्रेत्यांच्या संपामुळे रुग्णांची गैरसोय होऊ नये, याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाच्यावतीने जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) यांनी आपल्या आधिपत्याखालील सर्व रुग्णालयांमध्ये पुरेसा औषध साठा उपलब्ध करून ठेवण्याच्या सूचनाही संबंधितांना दिल्या होत्या. त्यानुसार औषध साठा ठेवण्यात आला.
औषध विक्रेत्यांचा संप यशस्वी
By admin | Published: May 31, 2017 1:06 AM