निराधार, वृद्ध, दिव्यांगांना शासनाच्या विविध अर्थसहाय्य योजनेंतर्गत मानधन मिळते. हे मानधन काढण्यासाठी ही मंडळी त्यांचे खाते असलेल्या बँकेत येरझारा घालतात. कारंजा येथील बडोदा बँकेच्या शाखेतही अनेक निराधारांचे खाते आहे. हे निराधार मिळालेले मानधन काढण्यासाठी बँकेत चकरा मारत आहेत, तथापि, कनेक्टिव्हिटी नसल्याच्या कारणावरून त्यांना परत पाठविले जात आहे. ही मंडळी दरदिवशी बँकेत येत असल्याने येथे गर्दी होऊन फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा होत आहे. याकडे संबधित विभागाने लक्ष द्यावे अशी मागणी वयोवृध्द नागरिकांकडून होत आहे. बँक व्यवस्थापकांच्या दुर्लक्ष धोरणामुळे या ठिकाणी ग्राहकांची गैरसोय होत आहे. येणाऱ्या ग्राहकांची गर्दी लक्षात घेता. कॅश काऊंटर दोन ठेवायला पाहिजे, मात्र एका ठिकाणाहून व्यवहार सुरू राहतो. तसेच निराधार योजनेसाठी स्वतंत्र खिडकीची व्यवस्था असायला पाहिजे. मात्र एकाच खिडकीवरून व्यवहार सुरू राहतो. त्यामुळे गर्दीचे प्रमाणत वाढते. तसेच नागरिकांची केवायसी करणे ही प्रकिया बंद ठेवण्यात आली आहे. पीक कर्जाच्या बाबतीत शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच निराधार नागरिक दररोज पैसे काढण्यासाठी बँकेत येतात. मात्र बँकेतील कर्मचारी नेट बंद असल्याचे सांगून त्यांना परत पाठवतात. त्यामुळे वयोवृध्द नागरिक विनाकारण दररोज चकरा करतात. या संदर्भांत बँक व्यवस्थापक धमगावे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी नेट नसल्याने आम्ही काय करू, असे सागून उडवाउडवीची उत्तरे दिली.
कनेक्टिव्हिटीचा अभाव दाखवून ज्येष्ठांची अवहेलना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 4:54 AM