आधी फ्रंटलाईन वर्कर्सचा इन्शुरन्सचा हप्ता केंद्र सरकार भरत होते. गेल्या दोन महिन्यांपासून तोही बंद करण्यात आला आहे. त्यातच आता कंत्राटी कर्मचाऱ्यांचा हा विम्याचा मुद्दा समोर आला आहे. गेल्या वेळी कोविडचा संसर्ग कमी झाल्यानंतर कंत्राटी कर्मचाऱ्यांना तातडीने कमी करण्यात आले होते. त्यावेळीही या कर्मचाऱ्यांनी सेवेत सामावून घेण्याची मागणी केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाले होते. एनआएचएममध्ये या कर्मचाऱ्यांना समाविष्ट केले जावे, अशी पूर्वीपासूनची या कर्मचाऱ्यांची मागणी आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनाही मधल्या काळात या कर्मचाऱ्यांनी निवेदन देऊन मागणी रेटली होती. दुसऱ्या टप्प्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर पुन्हा कंत्राटी कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांच्या मुदतीवर घेण्यात आले आहे. मात्र त्यांना विमा कवच देण्यात आले नाही. विमा कवच देण्यासंदर्भात शासनस्तरावर हालचाली सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, एनआरएचएममध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण मिळालेले आहे. तीन महिन्यांच्या करारावर असलेल्या कर्मचाऱ्यांनादेखील विमा संरक्षण मिळावे, अशी मागणी जोर धरत आहे.
०००
कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर
गरजेनुरूप शासन कंत्राटी कर्मचाऱ्यांचा वापर करून घेत आहे. यापूर्वी कर्मचाऱ्यांना कमी केले होते. आता पुन्हा घेण्यात आले असले तरी कायमस्वरूपी ऑर्डर दिलेली नाही, यामुळे नाराजी आहे.
०००
कोविड केअर सेंटरवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करून घेण्याची मागणी मागणी आहे. एनआरएचएममध्ये तरी समाविष्ट केले जावे, अशी मागणी आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांनादेखील विमा संरक्षण मिळायला हवे.
- महेंद्र साबळे, पदाधिकारी, संघटना
००००
वाशिम जिल्ह्यात आशा, अंगणवाडी सेविका, एनआरएचएममध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण मिळालेले आहे. कोविड केअर सेंटरमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांनादेखील विमा संरक्षण देण्याबाबत वरिष्ठ स्तरावर हालचाली सुरू असल्याचे समजते. वरिष्ठांच्या आदेशानुसार कोविड केअर सेंटरमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांदेखील विमा संरक्षणाचा लाभ दिला जाईल.
डां. अविनाश आहेर
जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम
०००००
ऑर्डरची शाश्वती नाही
कोविड केअर सेंटरमध्ये कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्रारंभी तीन महिन्यांची ऑर्डर दिली होती. त्यानंतर त्यांच्याकडून पुन्हा कागदपत्रे घेऊन ऑर्डर नवीन केल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे किमान ११ महिन्यांची तरी ऑर्डर द्यावी, अशी या कर्मचाऱ्यांची मागणी आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
०००
सेवेत सामावून घेण्याची मागणी
मलेरियाच्या साथीदरम्यान ९० दिवसांसाठी कर्मचाऱ्यांना घेण्यात आले होते. नंतर सरकारने त्यांना पुढील सर्व भरतीप्रक्रियेमध्ये ५० टक्के आरक्षण देऊन सेवेत कायम केले होते. त्याच पद्धतीने कोविड केअर सेंटरमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करून घ्यावी, अशी मागणीही या कर्मचाऱ्यांकडून होत आहे.
०००००
१५ जण पॉझिटिव्ह
कोविड केअर सेंटरमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी जवळपास १५ जण आतापर्यंत कोरोनाबाधित झाले असून, उपचारानंतर ते बरेही झाले आहेत. दरम्यान, कंत्राटी कर्मचाऱ्यांना आरोग्यविषयक पीपीइ किट, मास्क व अन्य साहित्य वेळोवेळी पुरविण्यात येत असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. कोरोनाकाळात चांगली आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न असून, शासनानेदेखील या सेवेचा विचार करून शासनसेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी होत आहे.
०००००
एकूण कर्मचारी २५७
कोरोनाबाधित १५