.............
‘ऑडिट’चा प्रश्न अद्याप प्रलंबित
वाशिम : जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट करण्यासंदर्भात शासनस्तरावरून निर्णय झाला असला तरी, त्याच्या मार्गदर्शक सूचना अद्याप प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे हा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे.
.............
सखी वन स्टॉप सेंटरची महिलांना मदत
वाशिम : अत्याचारग्रस्त महिलांना पोलीस, वकील, समुपदेशकांची नितांत गरज असते. अशावेळी सर्व सुविधा पुरविण्याचे काम सखी वन स्टॉप सेंटरकडून करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुभाष राठोड यांनी दिली.
.............
नव्या रस्त्याच्या कडेला वृक्ष लावण्याची मागणी
वाशिम : वाशिम ते अनसिंग या रस्त्याचे रुंदीकरण करीत असताना मोठमोठे वृक्ष तोडण्यात आले. मात्र त्याठिकाणी नव्याने वृक्षलागवड करण्याचा संबंधित कंत्राटदाराला विसर पडला आहे. वृक्षलागवड करण्याची मागणी अविनाश मुळे यांनी सोमवारी केली.
...............
नियमाचे पालन करण्याचे आवाहन
जऊळका रेल्वे : कोरोनापासून बचावासाठी शासनाने आखून दिलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. नागरिकांनी नियमाचे पालन करून स्वत:चे रक्षण करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी केले आहे.
..................
अवैध रेती उपशावर कारवाईच्या सूचना
वाशिम : तालुक्यात एकाही रेतीघाटाचा लिलाव झालेला नाही. असे असताना चोरट्या मार्गाने अवैध रेती उपसा सुरूच आहे. याप्रकरणी कारवाई करावी, अशा सूचना जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांनी मंगळवारी तहसीलदारांना दिल्या आहेत.
.............
वाहन परवाना मिळण्यास विलंब
मेडशी : कोरोना काळात वाहन परवाना मिळण्यास अर्ज केलेल्या अनेकांना चार ते पाच महिन्यापासून परवाना मिळालेलाच नाही. हा प्रश्न विनाविलंब निकाली काढण्यात यावा, अशी मागणी यश कडू, मंगेश कडू यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे मंगळवारी निवेदनाद्वारे केली.
...............
प्रवासी वाहनांमध्ये नियमाचे उल्लंघन
वाशिम : शहरातील पुसद नाका, हिंगोली नाका, रिसोड नाका येथून विविध ठिकाणी अवैध प्रवासी वाहतूक केली जात आहे. ही वाहने खचाखच भरून जात असून नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे. वाहतूक विभागाने लक्ष पुरवावे, अशी मागणी प्रमोद राठोड यांनी सोमवारी केली.
...............
‘त्या’ प्रकरणाच्या तपासाची मागणी
वाशिम : गतवर्षी लॉकडाऊन काळात हैदराबादच्या कोल्ड स्टोरेजमध्ये संत्रा साठवून ठेवला होता, मात्र तो संबंधित दलालाने परस्पर विकला. याप्रकरणी मालेगाव पोलिसात तक्रार दाखल करूनही न्याय मिळालेला नाही. प्रकरणाचा तपास गतीने व्हावा, अशी मागणी शेतकरी संतोष गजानन केळे यांनी मंगळवारी निवेदनाद्वारे केली.
..............
डिझेलचे दर वाढल्याने नागरिक हैराण
वाशिम : पेट्रोल व डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्याचा बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला असून ऑटोचालक, मालवाहू वाहनधारक आणि कृषिमालाची ने-आण करणारे वाहनचालक अडचणीत सापडले आहेत.
..............
उपकेंद्रांची प्रलंबित कामे पूर्ण करा!
वाशिम : जिल्ह्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीतील पाण्याचा सिंचनासाठी वापर व्हावा, यासाठी बॅरेजेस उभारण्यात आली. मात्र नदीकाठावर उभारण्यात येणाऱ्या दोन विद्युत उपकेंद्रांची कामे निधीअभावी प्रलंबित असल्याने पैनगंगा नदीच्या काठावरील शेतकऱ्यांना सिंचनात अडथळा जाणवत आहे.
...........
महामार्ग पोलीस केंद्राकडून वाहनचालकांचे प्रबोधन
वाशिम : अमानी महामार्ग पोलीस केंद्राकडून २ मार्च रोजी वाहनचालकांचे प्रबोधन करण्यात आले. अपघात टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांसह वाहन चालकांनी तोंडाला मास्क लावावे, असे आवाहन यावेळी पोलीस उपनिरीक्षक नितीन दांदडे यांनी केले.
.............
मृदासंवर्धनासंबंधी शेतकऱ्यांना मार्गदर्शन
किन्हीराजा : समृद्ध गाव स्पर्धा उपक्रमांतर्गत सध्या परिसरातील गावांमध्ये ‘ऑनलाईन’ पद्धतीने प्रशिक्षण देणे सुरू आहे. या माध्यमातून प्रामुख्याने जलव्यवस्थापनाविषयी जनजागृती केली जात असून, रविवारी मृदासंवर्धनासंबंधी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
..............
छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास जलाभिषेक
वाशिम : ‘३६५ दिवस शिवजलाभिषेक सोहळा’ या उपक्रमांतर्गत येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास मंगळवारी सकाळी जलाभिषेक करण्यात आला. यावेळी शिवम बेंद्रे, महेश धोंगडे, योगेश लोनसुने, स्वप्निल विटोकार, डॉ. मोहन गोरे, ऋषिकेश अंभोरे आदींची उपस्थिती होती.
............
मेडशी वळणरस्त्यावर फलक लावण्याची मागणी
मेडशी : अकोला येथून मेडशीकडे येणाºया रस्त्यावर असलेल्या वळणमार्गावर कुठलाही दिशादर्शक फलक नसल्याने दैनंदिन किरकोळ अपघात घडत आहेत. रस्त्याच्या दोन्हीकडून दिशादर्शक फलक लावण्यात यावा, अशी मागणी शे. अलताफ यांनी मंगळवारी केली.
..............
जिल्हा रुग्णालयात स्वच्छतेची मागणी
वाशिम : स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल होणाºया रुग्णांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नाही. यासह स्वच्छताही ठेवली जात नाही. याकडे रुग्णालय प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी नीलेश धाबे यांनी सोमवारी केली.