यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, अपर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक अतुल कानडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) विकास बंडगर, आयएमए अध्यक्ष डॉ. अनिल कावरखे यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. म्हणाले, जिल्ह्यात गत काही दिवसांत कोरोना सुरक्षा नियमांचे पालन करण्याकडे नागरिकांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. बाजारपेठेत तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी कडक उपाययोजना करण्यात येणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
नगरपालिकेने भाजीपाला, फळे विक्रेत्यांना विकेंद्रित स्वरुपात जागा उपलब्ध करून देऊन एकाच ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना करावी. तसेच ग्रामीण भागात होणाऱ्या आठवडी बाजारांच्या दिवशी ग्रामसेवकांनी स्वत: उपस्थित राहून कोरोना सुरक्षा नियमांचे पालन होईल, यासाठी आवश्यक कारवाई करावी. प्रवासी वाहतुकीदरम्यान प्रत्येकाने मास्कचा वापर करणे बंधनकारक असून त्याची जबाबदारी परिवहन विभागावर राहील. खुल्या मैदानात अथवा क्रीडांगणावर जाताना मास्कचा वापर करणे आवश्यक आहे, त्याशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाऊ नये, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.