लोकमत न्यूज नेटवर्क रिसोड (वाशिम): तालुक्यातील ग्रामीण भागांत यंदा तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यानंतर शहराला पाणी पुरवठा करणाºया अडोळ प्रकल्पाची पातळीही झपाट्याने घटत आहे. त्यामुळे शहरवासियांनाही पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची भिती आहे. या पृष्ठभूमीवर रिसोडच्या तहसीलदारांनी शुक्रवारी या प्रकल्पाची पाहणी केली असून, या प्रकल्पातून अवैध उपसा होत असेल, तर त्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. रिसोड तालुक्यात गतवर्षी वार्षिक सरासरीच्या केवळ ८१.६८ टक्के पाऊस पडला. त्यात पावसाळ्यातील पावसाच्या खंडादरम्यान शेतकºयांनी प्रकल्पातील पाण्याच्या आधारे पिके जगविली, तर रब्बी हंगामातही मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा झाला. त्यामुळे तालुक्यातील बहुतांश प्रकल्प हिवाळ्यातच कोरडे पडल्याने ग्रामीण भागांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. आता शहराला पाणी पुरवठा करणाºया अडोळ प्रकल्पाची पातळीही झपाट्याने खालावत आहे. सद्यस्थितीत या प्रकल्पात २५ टक्क्यांच्या जवळपास पाणीसाठा उरला आहे. त्यामुळे शहरवासियांना पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची भिती निर्माण झाली आहे. या पृष्ठभूमीवर रिसोडचे तहसीलदार गणेश पांडे यांनी अडोळ प्रकल्पाला शुक्रवार १५ मार्च रोजी भेट देऊन पाहणी केली. पाटबंधारे विभागाच्या परवानगीशिवाय या प्रकल्पातून अवैध उपसा होणार नाही, याची दखल घेण्याच्या सुचना त्यांनी सहकारी अधिकारी व कर्मचाºयांना दिल्या असून, या प्रकल्पातून अवैध पाणी उपसा होत असल्याचे आढळून आल्यास पाटबंधारे विभागाला सुचीत करून संबंधितांना नोटीस देण्यात येतील, तसेच दखल न घेतल्यास मोटारपंप जप्त करण्यात येतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
शहराला पाणी पुरवठा करणाºया अडोळ प्रकल्पातून अवैध उपसा होऊ नये, याची काळजी घेण्यात येत आहे. यासाठी प्रशासनाकडून संपूर्ण प्रकल्पावरील मोटारपंपांची पाहणी करण्यात येणार असून, यात अवैध पाणी उपसा होत असल्याचे आढळल्यास तो तात्काळ बंद करण्यात येईल. -गणेश पांडे, मुख्याधिकारी, न.प. रिसोड