संतोष वानखडे । लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा परिषद शाळेत दर्जेदार शिक्षण मिळत नसल्याची ओरड नेहमीच होते. मात्र, याला अपवाद रिसोड तालुक्यातील नावली येथील जिल्हा परिषद शाळा ठरली आहे. गत दोन वर्षांपासून राबवित असलेल्या विविध अभिनव उपक्रमामुळे परिसरातील कॉन्व्हेंटमधील तसेच शहरी भागात शिक्षणासाठी गेलेले १२५ विद्यार्थी यावर्षी शाळेत परतले आहेत.खासगी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षण दर्जेदार नसल्याची मानसिकता शहरी भागातसोबतच ग्रामीण भागाातील बहुतांश पालकवर्गाची आहे. परिणामी शहरी भागातील खासगी शाळा किंवा नजीकच्या कॉन्व्हेंटमध्ये पाल्याला प्रवेश देण्याकडे पालकांचा कल राहतो. याला अपवाद ठरली ती रिसोड तालुक्यातील नावलीची जि.प. शाळा. या शाळेत पहिली ते सातवीपर्यंत वर्ग आहेत. मुख्याध्यापक गारडे यांच्यासह शिक्षकांनी शाळेचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी पुढाकार घेतला. पालकांच्या सहकार्यातून लोकवर्गणी केली आणि चार लाख रुपयांचा निधी उभारला. या निधीतून चार वर्गखोल्या डिजिटल करण्यात आल्या. अन्य उपक्रमही राबविण्यात आले. या सर्वांचा सकारात्मक परिणाम दिसून आला. गतवर्षी या शाळेत १४५ विद्यार्थी शिक्षण घेत होते. यावर्षी या शाळेत २७० विद्यार्थ्यांचा प्रवेश असून, कॉन्व्हेंट व शहरी भागातील विद्यार्थी या जिल्हा परिषद शाळेत शिक्षणासाठी आल्याची माहीती जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांनी दिली.
कॉन्व्हेंटचे विद्यार्थी परतले जिल्हा परिषद शाळेत!
By admin | Published: June 30, 2017 1:42 AM