लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून घडलेल्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश प्रल्हाद ठेंगडे यास येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश एस.एम. मेनजोगे यांनी २ नोव्हेंबर रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सदर प्रकरणातील अन्य दोन आरोपींना दीड वर्षाचा; तर एकास वर्षभराच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. वाशिम येथील भवानी नगर परिसरात ७ एप्रिल २०१८ रोजी रात्री ८.४५ वाजताच्या सुमारास सदर खून प्रकरण घडले. याप्रकरणी मृतक वसीमखान अजीजखान पठाण (वय ४०) याचे काका अफसरखाँ हैदरखाँ पठाण यांनी शहर पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली होती. त्यात नमूद होते, भवानी नगर येथील देशी दारु दुकानासमोर त्यांचा पुतण्या वसीमखाँ याला भवानी नगर येथील काही मुलांनी मारहाण केली व त्याला वाशिम क्रिटीकल केअर नामक दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती मृतकाची वहिनी नजमा यांनी दिली. सदर घटनेची माहिती मिळताच वसीमखाँ याला पाहण्यासाठी दवाखान्यात गेलो असता वसीमच्या डोक्याला, मानेवर व पोटात गंभीर इजा झाल्याचे दिसले. यावेळी वसीमने घडलेला सर्व घटनाक्रम आपणास सांगितला. भवानी नगरमधील गणेश प्रल्हाद ठेंगडे, आकाश प्रल्हाद ठेंगडे, विशाल किसन इंगळे व प्रल्हाद गणपत ठेंगडे यांनी लोखंडी पाईप, रॉड व चाकूने आपणास मारहाण करून जखमी केल्याचे वसीमने सांगितले. त्यानंतर त्यास अकोला येथे उपचारासाठी हलविले असता त्याठिकाणी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अफसरखाँ पठाण यांच्या अशा आशयाच्या तक्रारीवरून पोलिसांनी नमूद आरोपींविरूद्ध कलम ३०२, ३०७, ३४ भादंविअन्वये गुन्हे दाखल करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले. विद्यमान न्यायालयाने याप्रकरणी फिर्यादी अफसरखॉ पठाण, प्रत्यक्षदर्शी सचिन नामदेव उखाडे व शेख इब्राहीम शेख सरदार कुरेशी यांच्यासह अकोला येथील न्यूरो सर्जन डॉ. अनुप केला, घटनास्थळ पंच करण अग्रवाल, जप्ती पंच रुस्तम अंभोरे, तत्कालीन तपास अधिकारी तथा पोलिस निरीक्षक विजय पाटकर आदिंच्या साक्षी तपासल्या. परिस्थितीजन्य सबळ पुरावे ग्राह्य धरून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश मेनजोगे यांनी कलम ३०२ अन्वये मुख्य आरोपी गणेश ठेंगडे यास जन्मठेपेची शिक्षा तसेच १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास पुन्हा एक वर्ष सश्रम कारवासाची शिक्षा तसेच आकाश ठेंगडे व विशाल इंगळे या दोन्ही आरोपींना कलम ३२४ अन्वये १८ महिने सश्रम कारवास व तीन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास पुन्हा सहा महिने कारावास; तर प्रल्हाद ठेंगडे यास कलम ३२३ अन्वये १ वर्षे सश्रम कारवास व एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १ महिना सश्रम कारवासाची शिक्षा सुनावली. याप्रकरणी सरकार पक्षातर्फे सरकारी सहाय्यक अभियोक्ता अॅड. अभिजित व्यवहारे यांनी काम सांभाळले.
खूनप्रकरणी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2019 7:22 PM