वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई
किन्हीराजा : अनेक दिवसांपासून विद्युत देयक न भरणाºया ग्राहकांवर महावितरणने कारवाई करणे सुरू केले आहे. त्यानुषंगाने परिसरातील गावांमध्ये महावितरणचे पथक दाखल होत असून थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित केला जात असल्याचे दिसून येत आहे.
............
उशिराने पेरलेला हरभरा बहरला
मेडशी : गतवर्षीच्या दमदार पर्जन्यमानामुळे चालूवर्षी बहुतांश जलस्रोतांना पाणी उपलब्ध आहे. यामुळे शेतकऱ्यांनी उशिरानेदेखिल हरभरा पिकाची पेरणी केली होती. हा हरभरा सध्या चांगलाच बहरला असून विक्रमी उत्पन्न हाती पडण्याचे संकेत शेतकऱ्यांमधून वर्तविण्यात येत आहेत.
...............
पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण
मालेगाव : सिंचन प्रकल्पात यंदा मुबलक जलसाठा शिल्लक होता. त्यामुळे जलसंपदा विभागाने नियोजन करून शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी पुरविले. त्यापोटी तालुक्यात १० लाखांच्या पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट बाळगण्यात आले होते. ते पूर्ण झाल्याची माहिती कार्यकारी अभियंता प्रशांत बोरसे यांनी दिली.
....................
पॅसेंजर रेल्वे सुरू होण्याची शक्यता धूसर
वाशिम : लॉकडाऊन काळात बंद करण्यात आलेली पूर्णा-अकोला पॅसेंजर रेल्वे सुरू झालीच नाही. आता तर कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत चालल्याने ही रेल्वे सुरू होण्याची शक्यता धूसर आहे. अनारक्षित एक्सप्रेस रेल्वेच्या फेऱ्या मात्र सुरू असल्याचे दिसून येत आहे.
................
प्रमुख चौकांमधून अवैध वाहतूक
वाशिम : शहरातील पोस्ट ऑफिस चौक, पुसद नाका, रिसोड नाका, अकोला नाका आदी मुख्य चौकांमधून दैनंदिन अवैध वाहतूक सुरू आहे. वाहनांमध्ये प्रवाशांना अक्षरश: कोंबून हा प्रकार सुरू आहे. याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष पुरवावे, अशी मागणी महेश धोंगडे यांनी गुरूवारी निवेदनाव्दारे केली.