शेलूबाजार : कोरोनामुळे सर्वच क्षेत्रात बदल झाले असून उदरनिर्वाहासाठी अनेकांनी परंपरागत व्यवसाय बदलून अन्य व्यवसायाची कास धरल्याचे शेलुबाजार परिसरात दिसून येत आहे.
गतवर्षात कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊन नंतर आता मिनी लॉकडाऊन सुरू करण्यात आल्याने अनेकांची आस्थापने अत्यावश्यक सेवेत येत नसल्याने बंद आहेत. परिणामी, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आली आहे. अशाच काही लघु व्यावसायिकांनी अत्यावश्यक सेवेत मोडणारे व्यवसाय थाटून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असल्याचे दिसून येत
आहे. १३ एप्रिल रोजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ३० एप्रिलपर्यंत अत्यावश्यक सेवेची आस्थापने वगळता इतर व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश दिले. मिनी लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे मागील ६ एप्रिलपासून इतर अनेक लघु व्यावसायिकांची प्रतिष्ठेने बंद असल्याने त्यांच्यावर उपासमारीचे मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. परिसरातील ४० खेड्याची बाजारपेठ म्हणून ओळखली जाणाऱ्या शेलूबाजार बाजारपेठेत ग्रामीण भागातील अनेक युवकांनी भाड्याच्या दुकानात व्यवसाय सुरु केले होते. ते व्यवसाय सध्या बंद असल्याने खिशातून भाडे देण्याची वेळ येऊ नये म्हणून अनेकांनी आपले व्यवसाय बदलले आहेत. लक्ष्मण गावंडे या युवकाचे जनरल स्टोअर्स दुकान आहे मागील ६ एप्रिलपासून व्यवसाय बंद असल्यामुळे त्यांनी आता भाजीपाल्याचे दुकान थाटले आहे. लक्ष्मणच नव्हेतर अनेक युवकांनी अत्यावश्यक सेवेत मोडणारे व्यवसाय ठिकठिकाणी रस्त्याचे कडेला सुरु करुन आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करित असल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षभराच्या काळात कित्येकांच्या नोकऱ्या गेल्या , व्यवसाय बंद पडले . या परिस्थितीमुळे खचून न जाता पुन्हा उभारी घेत कित्येक जणानी विविध व्यवसाय हाती घेतले आहे.