वाशिम : जिल्ह्यात १ जूनपासून कोरोना संसर्गाने बाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. ५ जुलै ते १३ जुलै या कालावधीत केवळ १०० नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोना बहुतांशी नियंत्रणात आला आहे; पण दुसरीकडे साथीच्या आजारांचे रुग्ण वाढत असून, शासकीय दवाखान्यांच्या तुलनेत खासगी दवाखान्यांमध्ये अशा रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे.
पावसाळ्यात विशेषत: चिकुनगुण्या, डेंग्यू, मलेरिया यासारख्या साथीच्या आजारांचा प्रसार होतो. ‘एडिसी इजिप्टी’ नामक डास चावल्यामुळे आजार बळावतो. हा डास हवेत ४०० मीटरपर्यंत उडू शकतो. या डासाच्या पायावर पांढरे पट्टे असतात. त्यामुळे त्याला ‘टायगर माॅस्क्युटो’ असेही म्हटले जाते. हा डास चावल्यास तीव्र ताप येण्यासोबतच असह्य डोकेदुखीही जाणवते. थंडी वाजण्यासह रक्तातील पांढऱ्या पेशींची संख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागते. काही वेळा रक्ताच्या उलट्यादेखील होऊ लागतात. हिवतापात थंडी वाजून ताप येणे, घाम येऊन अंग गार पडणे, डोके दुखणे, उलट्या होणे ही लक्षणे आढळतात. त्यामुळे नागरिकांनी स्वत:ची काळजी घेणे गरजेचे आहे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
..........................
(बॉक्स)
घराभोवतीची परिसर ठेवा स्वच्छ
विशेषत: पावसाळ्यात साथीच्या आजारांचे प्रस्थ वाढते. त्यापासून स्वत:ला सुरक्षित ठेवण्याकरिता काळजी घेणे गरजेचे आहे. घराभोवतीचा परिसर नियमित स्वच्छ ठेवणे, डबकी असल्यास ती तत्काळ बुजविणे, साचलेल्या पाण्यातील डासांच्या अळ्या नष्ट करणे, झोपताना मच्छरदाणीचा वापर करणे यासारख्या उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे.
.........................
प्रशासनाकडून युद्धस्तरावर जनजागृती
चिकुनगुण्या, डेंग्यू, मलेरिया आदी साथीच्या आजारांपासून नागरिकांचा बचाव व्हावा, यासाठी प्रशासनाकडून जनजागृती करण्यात येत आहे. दर आठवड्याला घरातील पाण्याची सर्व भांडी रिकामी करा, ही भांडी आतून स्वच्छ घासून व पुसून घ्या, घरावरील पाण्याच्या टाक्यांना घट्ट झाकण लावा, आदींबाबत मार्गदर्शन केले जात आहे.
...................
कोट :
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस होत आहे. या दिवसांमध्ये काही ठिकाणी पाण्याची डबके साचून डासांचा प्रादुर्भाव बळावतो. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. खासगी दवाखान्यांमध्ये डेंग्यू, मलेरियासदृश आजाराचे रुग्ण आढळत असले तरी जिल्हा सामान्य रुग्णालयात मात्र किमान आतापर्यंत तरी असे रुग्ण आढळलेले नाहीत.
- डाॅ. मधुकर राठोड
जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम