लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आरटीईअंतर्गत पहिल्या लॉटरीमध्ये राज्यातील २.२५ लाखापैकी ८२ हजार बालकांची मोफत प्रवेशासाठी निवड झाली असून, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शिक्षण विभागाच्या पुढील सूचनेनुसार पालकांना पडताळणी समितीकडे जाता येणार आहे. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, दिव्यांग, मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सर्व माध्यमांच्या खासगी, विनाअनुदानित व स्वयंअर्थसाहाय्यित शाळांमध्ये पहिल्या वर्गात २५ टक्के कोट्यातून मोफत प्रवेश दिला जातो. यावर्षी राज्यातील ९,४३२ शाळांमध्ये मोफत प्रवेशासाठी ९६ हजार ६८४ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. एकूण ९६ हजार ६८४ जागांकरिता २ लाख २२ हजार ५८४ बालकांनी ऑनलाइन अर्ज केले होते. ७ एप्रिलला पुण्यातून एकाच वेळी लॉटरी काढली असून, यामध्ये ८२ हजार १२९ बालकांची निवड करण्यात आली. मात्र, त्यानंतर कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्बंध कठोर करण्यात आल्याने आणि संचारबंदीही लागू केल्याने प्रवेश प्रक्रिया प्रभावित पडली. ३० एप्रिलनंतर प्रवेश प्रक्रिया पूर्ववत होण्याचा अंदाज वर्तविला जात होता. परंतु, १५ मेपर्यंत संचारबंदीला मुदतवाढ दिल्याने प्रवेश प्रक्रिया आणखी लांबणीवर पडली आहे. पुढील आदेशापर्यंत प्रवेश प्रक्रिया स्थगित असून, पडताळणी समितीकडे पालकांना जाऊ नये, अशा सूचनाही शिक्षण विभागाने दिलेल्या आहेत. पहिल्या सोडतीमध्ये वाशिम जिल्ह्यातील ६३० बालकांची निवड झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर निवड प्रक्रिया राबविली जाईल, असे सांगितले जात आहे. तूर्तास बालकांसह पालकांना मोफत प्रवेशाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. जिल्ह्यातील १०३ शाळांमधील ७०९ जागांकरिता पहिल्या सोडतीत ६३० बालकांची निवड झाली आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे प्रवेश प्रक्रिया तूर्तास थांबविण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर वरिष्ठांच्या सूचनेनुसार प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येईल. तोपर्यंत पालकांनी पडताळणी समितीकडे जाऊ नये.- गजानन डाबेराव, उपशिक्षणाधिकारी, प्राथमिक, वाशिम
Right To Education :कोरोनामुळे आरटीई प्रवेश प्रक्रिया लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2021 11:47 AM