वाशिम : कोरोनाने कुणाचे वडील हिरावले तर कुणाची आई, कुणाचे पती. घरातील कर्ता पुरुष गेल्याने शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी महिला व बालकल्याण तसेच बालविकास विभागातर्फे सर्वेक्षण केले जात आहे. ९ जूनपर्यंतच्या आकडेवारीनुसार कोरोनाने ८० महिलांचे पती हिरावले असून, या महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून दिला जाणार आहे.
कोरोना संसर्गामुुळे दोन्ही पालक गमाविलेल्या बालकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देऊन त्यांचे यथायोग्य संगोपन होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची जबाबदारी शासनाने जिल्हास्तरीय कृती दलावर सोपविण्यात आली आहे. कोरोनामुळे आई वडील दोघांचाही मृत्यू झाला असल्यास त्यांच्या पाल्याला मदत करण्याची घोषणा सरकारने केली आहे. दरम्यान, कोरोनामुळे पतीचा मृत्यू झालेल्या महिलांनादेखील शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील तालुकास्तरावर नोडल अधिकारीदेखील नियुक्त केले असून सर्वेक्षण करण्यात येत आहे. जिल्ह्यातील ८० महिलांच्या पतीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती असून, या महिलांना निकषानुसार शासनाच्या विविध योजनेतून लाभ दिला जाणार असल्याचे महिला व बालविकास विभागाने स्पष्ट केले.
००००००००
जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण रुग्ण ४०८२६
बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३९४२०
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण ८१२
पुरुष रुग्ण २९०५५
महिला रुग्ण १११७८
.......
तालुकानिहाय सर्वेक्षण
कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी यापूर्वी महिला व बालकल्याण विभाग, महिला व बालविकास विभाग, आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत सर्वेक्षण करण्यात आले होते. आता कोरोनामुळे पती हिरावलेल्या महिलांचा शोध घेण्यासाठी सर्वेक्षण केले जात आहे. तालुकास्तरीय नोडल अधिकाऱ्यांचीदेखील नियुक्ती करण्यात आली आहे. कोरोनामुळे पती गमावलेल्या महिलांनादेखील शासनाच्या विविध योजनांसाठी महिला व बालविकास विभागाकडे संपर्क साधता येणार आहे. तालुकास्तरीय बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे तसेच आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांकडेदेखील माहिती देता येणार आहे.
००००
कोरोनाने ८० महिलांना केले निराधार
कोरोनाने जिल्ह्यातील ८० महिलांचे पती हिरावले आहेत. घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबाचा गाडा चालविताना या महिलांना आता आर्थिक संकटांना सामोरे जावे लागणार आहे.
रिसोड तालुक्यातील १७ महिलांच्या पतीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. याप्रमाणे मालेगाव तालुक्यातील १०, वाशिम ग्रामीण १६, मंगरूळपीर ४, मानोरा ११, कारंजा ८, वाशिम शहरी भागातील १४ पतींचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
पतीचा मृत्यू झाल्याने या महिलांवर आर्थिक संकट ओढावले आहे. संजय गांधी निराधार योजना यासह अन्य शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येत आहे. निकषानुसार मदतीसाठी पात्र ठरणाऱ्या महिलांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात येणार आहे.
०००००००
तालुकास्तरीय सर्वेक्षण
कोट
कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांचा सर्व्हे करण्यात आला आहे. आता कोरोनामुळे पती गमावलेल्या महिलांची माहिती संकलित केली जात आहे. तालुकास्तरावर नोडल अधिकाऱ्यांची नियुक्तीदेखील करण्यात आली आहे. निकषानुसार महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
- सुभाष राठोड
महिला व बालविकास अधिकारी, वाशिम