वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने स्वच्छ भारत मिशनअंतर्गत राज्यभरात कार्यरत निगराणी समितीमधील सदस्यांचे प्रशिक्षण रखडले आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर प्रशिक्षण होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा दोननुसार प्रत्येक जिल्ह्यात शौचालय बांधकामाची उद्दिष्टपूर्ती जवळपास पूर्ण झालेली आहे. बांधलेल्या शौचालयाचा वापर करणे आणि उघड्यावरील शौचवारी नियंत्रणात आणणे या उद्देशातून गावपातळीवर सरपंचांच्या अध्यक्षतेखाली निगराणी समितीची स्थापना करण्यात आली. या समितीमध्ये ग्रामपंचायत सदस्यांसह पोलीस पाटील, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिकांचा समावेश आहे. या समितीतील सदस्यांना जिल्हास्तर व पंचायत समिती स्तरावर प्रशिक्षण देण्याचे नियोजन जिल्हा परिषद प्रशासनाने केले होते. मात्र, गत दोन महिन्यांपासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे प्रशिक्षण लांबणीवर पडले आहे. आता तर कोरोनाचा स्फोट होत असल्याने प्रशिक्षण आणखीनच लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. निगराणी समितीलाच प्रशिक्षणाची गरज असल्याने ते उघड्यावरील शौचवारीला नियंत्रणात कसे आणतील, असा प्रश्न उपस्थित होत आहे.