वाशिम : कोरोनाने सर्वच प्रथा, परंपरा, रूढी, संकल्पनांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत. लग्न समारंभातील उपस्थितीवर मर्यादा आल्याने कोरोनाकाळात लग्न समारंभातील बडेजावपणा आपसूकच गायब झाला आहे.
मुला-मुलींचे लग्न थाटामाटात करण्याची प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. त्यानुसार प्रत्येकच आई-वडील आपापल्यापरीने लग्न सोहळ्यात बडेजावपणाचे प्रदर्शन करून समाजात आपली पतप्रतिष्ठा दाखविण्याचा प्रयत्न करतात. मात्र, कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे लग्न सोहळ्यातील उपस्थिती व वेळेवर निर्बंध लादण्यात आल्याने लग्न समारंभातील बडेजावपणाला ‘ब्रेक’ लागत आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत काही वर-वधूंनी कोरोनाला वाकुल्या दाखवत अगदी थाटात आपले लग्न उरकून घेतले. मात्र, सध्या राज्य सरकारने लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये लग्न सोहळ्यासाठी २५ जणांची उपस्थिती आणि दोन तास वेळ असे निर्बंध घातल्यामुळे काही वर-वधूंनी आपले नियोजित लग्न पुढे ढकलले आहे. मात्र, बहुतांश वर-वधू मन मोडून लग्न उरकून घेत आहेत. समाजात प्रतिष्ठा जपण्यासाठी वेळप्रसंगी कर्ज काढून लग्न सोहळ्यात पैशांची उधळपट्टी केली जाते. या खटाटोपात अनेक मध्यमवर्गीयांवर कर्जबाजारी होण्याची वेळ येते. मात्र, कोरोनामुळे या सर्व बडेजावपणाला ‘ब्रेक’ लागला असून, गरीब असो वा श्रीमंत, सर्वांच्या मुला-मुलींचे लग्न अगदी साधेपणाने पार पडत आहे. अगदी कमी खर्चात लग्नसोहळा आटोपत असल्यामुळे अनेक गरीब व मध्यमवर्गीय आई-वडिलांनी मात्र सुटकेचा नि:श्वास टाकला आहे, तर श्रीमंतांमधून लग्नात आनंद लुटायला मिळत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
००
लग्नासाठी खर्च येतोय कमी
लग्न सोहळ्यातील खर्चाच्या बचतीसाठी राज्यात सर्वत्र सामूहिक विवाह सोहळ्यांची चळवळ जोमाने राबविण्यात येत होती. मात्र, कोरोनाने या सर्वांना फाटा देऊन वैयक्तिक लग्न सोहळाही कमी खर्चात पार पाडता येतो, अशी बळजबरीने का होईना, पण शिकवण दिली आहे. जेवणावळीचा खर्च कमी झाला, मंडप, डेकोरेशन, पत्रिका यासह अन्य खर्चाला आळा बसला आहे.