पूर्वी मुले व मुली शाळा संपल्यानंतर किंवा शाळेच्या वेळेपूर्वी सकाळी, दुपारी किंवा सायंकाळी मिळेल त्या वेळेत मोकळी मैदाने, गावातील सभामंडप, मंदिरे किंवा वस्तीमधील खुल्या जागांवर एकत्र येऊन विविध पारंपरिक खेळ खेळत असत. त्यात लंगडी, लगोरी कबड्डी, दोरीवरच्या उड्या, आट्यापाट्या, लपंडाव, विटी दांडू, टिग्गर, धापकुटी, तळ्यात मळ्यात आदिंसह विविध खेळांचा त्यात समावेश होता. या मैदानी खेळांमुळे मुलांच्या शारीरिक व बौद्धिक वाढीस चालना मिळत होती. शिवाय एकत्र खेळण्यामुळे सांघिक भावना निर्माण होऊन मैत्रीदेखील होत होती. परंतु आता सर्वच बदलले आहे. त्यात कोरोना काळात शाळा बंद पडून ऑनलाईन शिक्षणावर भर देण्यात येत असल्याने मुलांच्या हाती स्मार्ट फोन आले आहेत. त्यामुळे लहान मुले ऑनलाईन गेमच्या आहारी गेल्याचे चित्र दिसत असून, या गेममुळे मुलांचा शारीरिक व बौद्धिक विकास खुंटत चालल्याने त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.
------००००००------
ऑनलाईन खेळापासून मुलांना थांबवा
कोरोना काळात क्रीडा प्रकारांवर मर्यादा असल्या तरी शारीरिक व बौद्धिक विकासाला चालना देणारे क्रीडा प्रकार करणे सहज शक्य आहे. शिवाय योगासनेही केली जाऊ शकतात. ऑनलाईन शिक्षणामुळे मुले मोबाईल, संगणकाला चिकटून बसत असून, त्यांना ऑनलाईन गेमचे वेड लागले आहे. आरोग्यावर याचा विपरित परिणाम होतो. त्यामुळे पालकांनी मोबाईल, संगणक आणि टीव्हीपासून मुलांना दूर ठेवावे, असे आवाहन शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त सागर गुल्हाने यांनी केले आहे.