जिल्ह्यातील सहाही शहरांसह ग्रामीण भागात फेब्रुवारी २०२१ पूर्वी कोरोना संसर्गाची संक्रमणस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात होती. त्यानंतर मात्र संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत बाधित होणाऱ्यांची संख्या ३२ हजार ६१० ने वाढून एकूण आकडा ३९ हजार ९४९ वर पोहोचला आहे; तर मृत्यूच्या संख्येनेही ४५५ ला गवसणी घातली आहे. दुसरीकडे इतर आजारांनीही गेल्या दीड वर्षांत सुमारे ५०० जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे खबरदारी म्हणून आधीच मृत्युपत्र करणाऱ्यांची संख्या वाढली असून ९९ जणांनी मृत्युपत्र केल्याची माहिती प्राप्त झाली.
.................
पाचपट संख्या वाढली
वाशिम येथील दुय्यम निबंधक कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, दरवर्षी साधारणत: १५ ते २० जण मृत्युआधी मालमत्ता कुटुंबातील नेमक्या कोणाला द्यायची, किती द्यायची, यासंबंधीचे मृत्युपत्र करून ठेवतात; मात्र गेल्या दीड वर्षात हे प्रमाण पाचपटीने वाढले असून जानेवारी २०२० ते मे २०२१ या कालावधीत ९९ जणांनी मृत्युपत्र केले आहे.
......................
कमी वयात मृत्युपत्र
कोरोना संसर्गाच्या संकटाने मृत्यू कधीही आणि कोणत्याही वयात होऊ शकतो, हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे मृत्यूनंतर मालमत्तेसाठी कुटुंबात कलह निर्माण होऊ नये, या उद्देशाने काही लोकांनी कमी वयातच मृत्युपत्र करून ठेवल्याची उदाहरणे आहेत.
मधुमेह, उच्च रक्तदाब, किडनीचे आजार असलेल्यांना कोरोनाचा संसर्ग जडल्यास शारीरिक व्याधी बळावून वेळप्रसंगी मृत्यूही ओढवतो. त्यामुळे मृत्युपत्र तयार करून ठेवण्यात गेल्या काही महिन्यांमध्ये वृद्धांचेही प्रमाण वाढलेले आहे.
............
दुय्यम निबंधक कार्यालयाकडे गेल्या दीड वर्षांत ९९ जणांनी मृत्युपत्र तयार केले असले तरी नोटरीसाठी मात्र कोणीच आलेले नाही. तसेही मृत्युपत्र हा दस्तावेज पर्यायी म्हणून गणला जातो. त्यामुळे नोकरी करण्याची विशेष गरज भासत नाही.
- ॲड. आर.पी. आरू, वाशिम