जिल्ह्यात गतवर्षी एप्रिल महिन्यात पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर ८ मार्च २०२१ पर्यंत १०,३७८ लोकांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला. त्यापैकी ८,८७२ लोकांनी कोरोनावर मात केली, तर १६३ लोकांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला. कोरोना संसर्गाचे प्रमाण गतवर्षी ऑगस्ट ते ऑक्टोबरदम्यान मोठ्या प्रमाणात वाढले. त्यानंतर कोरोना संसर्ग नियंत्रित होऊ लागला. या वर्षी जानेवारी महिन्याच्या सुरुवातीचे चित्र पाहता जिल्हा कोरोनामुक्त होण्याची शक्यताही वाटू लागली होती; परंतु जानेवारीच्या मध्यांतरापासून कोरोना संसर्ग पुन्हा वाढू लागला. त्यात गेल्या आठवडाभरात २ मार्च ते ८ मार्चपर्यंत तब्बल १,२८८ लोकांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला. कोरोना संसर्गाच्या आकडेवारीचा आलेख पाहता मार्च महिन्यात बाधितांचे प्रमाण सर्वाधिक आहे.
---------------------
कारंजा तालुक्याची स्थिती गंभीर
जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे सर्वाधिक प्रमाण सद्य:स्थितीत कारंजा तालुक्यात असल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालावरून स्पष्ट होत आहे. या तालुक्यात २ मार्च ते ८ मार्च या कालावधीत ४७० लोकांना कोरोना संसर्ग असल्याचे निदान आहे. जिल्ह्याच्या आठवडाभरातील एकूण बाधितांपैकी हे प्रमाण जवळपास ४० टक्के आहे. कोरोना संसर्गाचा कहर सुरू असलेल्या लगतच्या अमरावती, यवतमाळ जिल्ह्यांशी या तालुक्याचा संबंध अधिक येतो. त्यामुळेच जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत कारंजातील कोरोना संसर्गाचे प्रमाण अधिक आहे.
---------------------
चेकपोस्टवरील तपासणी कुचकामी
कारंजा तालुक्यात वाढत असलेला कोरोना संसर्गाची गंभीर दखल घेत तहसीलदारांनी या तालुक्याला जोडणाऱ्या अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांसह अकोला जिल्ह्याच्या सीमेवर मिळून पाच चेकपोस्ट सुरू केल्या. या ठिकाणी २ पोलीस आणि २ आरोग्य कर्मचारी २४ तास तैनात राहून परजिल्ह्यातून येणाऱ्या वाहनांतील प्रवाशांची तपासणी करीत आहेत. गेल्या १५ दिवसांपासून या चेकपोस्ट सुरू असतानाही कारंजा तालुक्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होत नसल्याचे दिसत आहे.
---------------------
आठवड्यातील कोरोना संसर्गाची स्थिती
दिनांक कोरोनाबाधित
२ मार्च १६६
३ मार्च १२४
४ मार्च १८३
५ मार्च १९०
६ मार्च २४५
७ मार्च २४२
८ मार्च १३८