वाशिम : जिल्ह्यात ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान कोरोना संसर्गाचे प्रमाण घटल्याने दिलासा मिळू लागला असतानाच जानेवारीत कोरोना संसर्गात वाढ होत असल्याचे दिसते. त्यातही जानेवारी महिन्यातील पूर्वार्धाच्या तुलनेत उत्तरार्धात कोरोना संसर्गात वाढ झाल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. जिल्ह्यात दिनांक १ ते २३ जानेवारीपर्यंतच्या एकूण ३३७ बाधितांपैकी १४० जण १६ ते २३ जानेवारी दरम्यानच्या तिसऱ्या आठवड्यातच आढळून आले आहेत. विशेष म्हणजे वातावरणात उष्णता वाढत असताना कोरोना संसर्गाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे.
वाशिम जिल्ह्यात एप्रिल २०२०मध्ये पहिला कोरोना रुग्ण आढळला होता. तथापि, पुढील तीन महिने कोरोना संसर्गाने फारसा वेग घेतला नाही; परंतु, जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांत जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा कहर झाला. आॅक्टोबरच्या उत्तरार्धापासून मात्र कोरोना संसर्गाचा वेग मंदावला. त्यामुळे जिल्हावासियांना दिलासा मिळाला. थंडीच्या काळात कोरोना संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात असताना याच कालावधीत कोरोना संसर्गाचा वेग मंदावल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले. आता मात्र थंडीचे प्रमाण कमी होत असताना कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढत असल्याचे दिसत आहे. त्यात जानेवारी महिन्यात २३ दिवसात वाशिम जिल्ह्यात एकूण ३३७ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यापैकी १४० लोकांना १६ ते २३ जानेवारी या आठ दिवसातच कोरोनाची लागण झाली आहे.
----------------------
सात हजारांचा टप्पाही ओलांडला
जिल्ह्यात एप्रिल २०२०पासून दाखल झालेल्या कोरोना संसर्गाचा वेग गेल्या काही दिवसात मंदावला असला तरी जानेवारी महिन्यापासून कोरोना संसर्ग पुन्हा वाढत असल्याचे दिसत आहे. अवघ्या २३ दिवसात जिल्ह्यातील ३३७ जणांना कोरोना संसर्ग झाला. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ७ हजार झाली. त्यापैकी ६,६७९ रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर १५२ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
----------------------
बाधितांच्या तुलनेत डिस्चार्जची संख्याही कमी
जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही कमी होत आहे. डिसेंबर महिन्यात ३१ दिवसात ४९७ लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला, तर ५८७ रुग्णांनी कोरोनावर मात केली. या महिन्यात एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. याउलट जानेवारी महिन्यात २३ तारखेपर्यंत ३३७ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आणि केवळ ३०९ रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
--------
जानेवारीतील कोरोनाची स्थिती
१ ते १५ जानेवारी १९७ डिस्चार्ज २०३
१६ ते २३ जानेवारी १४० डिस्चार्ज १०६