वाशिम जिल्ह्यात ७ मार्च ते ११ मार्च दरम्यान ७१९ व्यक्तींना कोरोना संसर्ग असल्याचे निदान झाले. त्याशिवाय जिल्ह्याबाहेर असलेल्या १० व्यक्तींनाही कोरोना संसर्ग असल्याचे निदान झाले आहे. गत पाच दिवसांत कोरोना बाधित आढळलेल्या ७१९ व्यक्तींमध्ये कारंजा तालुक्यातील २८२, वाशिम तालुक्यातील १८२, तर मंगरुळपीर तालुक्यातील १३३ व्यक्तींचा समावेश आहे. अर्थात या तीन जिल्ह्यातच कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षणीय असल्याचे स्पष्ट होत आहे. आरोग्य विभागाकडून कोरोना संसर्गावर नियंत्रणासाठी व्यापक उपाययोजना करण्यात येत असल्या तरी त्या पुरेशा नसल्याचे तीन तालुक्यातील कोरोना बाधितांच्या संख्येवरून दिसत आहे. वाशिम हे जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असून, अमरावती, यवतमाळमधून येणारे नागरिक हे कारंजा मंगरुळपीरमार्गेच वाशिम येथे दाखल होतात, तर अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात सद्यस्थितीत कोरोना संसर्गाचा उद्रेकच सुरू आहे. त्यामुळे या जिल्ह्यातून येणारे नागरिकच उपरोक्त तीन तालुक्यात कोरोना संसर्ग पसरवित नाहीत ना, अशी शंकाही उपस्थित होत आहे. या मार्गावर नसलेल्या रिसोड, मालेगाव आणि वाशिम तालुक्यात ७ मार्च ते ११ मार्चदरम्यानच कोरोना बाधित आढळून आलेल्या व्यक्तींची संख्या तुलनेत खूप कमी आहे. रिसोड तालुक्यात या कालावधीत ४८, मानोरा तालुक्यात ४३, तर मालेगाव तालुक्यात ३१ व्यक्तींना कोरोना संसर्ग असल्याचे निदान झाले आहे.
--------
कारंजा तालुक्यात कठोर उपायांची गरज
अमरावती, यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या कारंजा तालुक्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाशिम जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. पाच दिवसांत आढळून आलेल्या ७१९ कोरोना बाधितांपैकी २८२ व्यक्ती कारंजा तालुक्यातीलच आहेत. अर्थात पाच दिवसांच्या कोरोना संसर्गातील प्रमाणाची सरासरी लक्षात घेतल्यास जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांपैकी कारंजा तालुक्यातीलच ३५ टक्के कोरोनाबाधितांचा समावेश आहे. यामुळे कारंजा तालुक्यात प्रशासनाने अधिक कठोर उपाययोजना करण्याची गरज असून, अमरावती, यवतमाळसह अकोला येथे येजा करणाऱ्या व्यक्तींची काळजीने तपासणी करण्याची गरज आहे.
-------------------
पाच दिवसांतील बाधितांची तालुकानिहाय संख्या
कारंजा २८२
वाशिम १८२
मं. पीर १३३
रिसोड ४८
मानोरा ४३
मालेगाव ३१