जिल्ह्यात एप्रिल महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. ऑगस्ट महिन्यापर्यंत जिल्ह्यात १७५३ कोरोनाबाधित रुग्ण तर ३० कोरोना बळींची संख्या होती. एकट्या सप्टेंबर महिन्यात नव्याने २,६२८ कोरोना रुग्णांची भर पडली तर ६१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. ऑक्टोबर महिन्यापासून कोरोनाचा आलेख खाली आला. ऑक्टोबर ते जानेवारी महिन्यापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात होती. जानेवारी महिन्याअखेर जिल्ह्यात एकूण ७,१४४ बाधित तर १५४ मृत्यू होते. फेब्रुवारी महिन्यातही रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून आले. गत तीन, चार दिवसांपासून वाशिमचा अपवाद वगळता शेजारच्या अमरावती, अकोला, बुलडाणा आदी जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. १४ फेब्रुवारी रोजी वाशिम जिल्ह्यातही ४४ कोरोनाबाधित आढळून आल्याने जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभाग अलर्ट झाला. शेजारच्या जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने जिल्ह्यातील नागरिकांनी अधिक दक्ष राहणे गरजेचे आहे. कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्ह्यातील नागरिकांनी मास्क किंवा रुमालचा वापर करणे, फिजिकल डिस्टन्सिंग आणि हात वारंवार धुणे या त्रिसुत्रीचे पालन करावे असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने सोमवारी केले.
००००००
आजाराची माहिती लपवू नका !
गत आठवड्यापासून शेजारच्या जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. वाशिम जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वेळीच रोखण्यासाठी नागरिकांनी बाजारपेठ, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, कोरोनाविषयक नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले. जिल्ह्यातही कोरोनाबाधितांची संख्या हळूहळू वाढत आहे. कोरोनावर लवकर उपचार झाल्यास रुग्ण बरा होतो. आजाराची माहिती न लपविता सर्दी, ताप, खोकला, घसा दुखणे व अन्य लक्षणे दिसताच स्वत:हून कोरोनाविषयक चाचणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले.
०००००
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू वाढत असल्याचे दिसून येते. कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून नागरिकांनी देखील मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन व हात वारंवार धुणे या त्रिसुत्रीचे पालन करावे.
- डॉ. अविनाश आहेर
जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम
000000000
बॉक्स
जानेवारीअखेर व फेब्रुवारी महिन्यातील कोरोनाविषयक आकडेवारी
प्रकारजानेवारीअखेर१ ते १४ फेब्रुवारी
एकूण बाधित ७१४४ १९०
अॅक्टिव्ह १५३ १२७
डिस्चार्ज ६८३६ २१४
मृत्यू १५४ ०२