लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभाग अलर्ट झाला असून पुरेशा संख्येत खाटा उपलब्ध करण्यावर भर दिला जात आहे. जिल्ह्यात सध्या १२६० खाटा उपलब्ध असून, आणखी खाटा उपलब्ध करण्यासंदर्भात वरिष्ठ यंत्रणेच्या संपर्कात असल्याचे आरोग्य विभागाने रविवारी स्पष्ट केले.मे महिन्यापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रित होती. जून, जुलै महिन्यापासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संदिग्धांचे अहवालही पॉझिटिव्ह येत असल्याने कोरोनाबाधित रुग्णांची संख्या चढती आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय, स्त्री रुग्णालय यासह तालुकास्तरीय कोविड केअर सेंटर येथे जून महिन्यात जवळपास ४५० खाटा कोरोनाबाधित रुग्णांसाठी उपलब्ध केल्या होत्या. जुलै महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढताच, रुग्णांसाठी खाटा अपूऱ्या पडू नये म्हणून प्रशासनाने अतिरिक्त खाटा उपलब्ध करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पाठविला. जुलै महिन्यात जवळपास ६८० खाटा उपलब्ध झाल्याने जिल्ह्यात एकूण खाटांची संख्या ११३० वर पोहचली. आता कारंजा येथे ८० आणि जिल्हा स्त्री रुग्णालय येथे ५० अशा एकूण १३० खाटा उपलब्ध झाल्याने सध्या जिल्ह्यात एकूण १२६० खाटा उपलब्ध आहेत. आणखी अतिरिक्त खाटा उपलब्ध करण्यासंदर्भात वरिष्ठांच्या संपर्कात असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे सरकारी रुग्णालय व कोविड केअर सेंटरमधील खाटा अपूºया पडू नये म्हणून वरिष्ठांशी पत्रव्यवहार केला. सध्या जिल्ह्यात १२६० खाटा उपलब्ध असून, वेळप्रसंगी आणखी खाटा उपलब्ध करण्यासंदर्भात वरिष्ठांच्या संपर्कात आहोत.- डॉ. अंबादास सोनटक्केजिल्हा शल्य चिकित्सक
कोरोना : रुग्णसंख्या वाढताच खाटांच्या संख्येतही वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2020 11:13 AM