लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोनामुळे आरोग्य सेवेचे बळकटीकरण करण्यावर सर्वाधिक भर दिला जात आहे. जिल्ह्यातही आरोग्य सुविधांमध्ये भर पडली असून, तीन ऑक्सिजन प्लांट तर एक ‘आरटीपीसीआर’ प्रयोगशाळाही उभारली आहे.जिल्ह्यात पहिली लाट फारशी धोकादायक ठरली नाही. दुसरीकडे कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, तसेच रुग्णांवर उपचार करण्यासाठी कोविड केअर सेंटर उभारण्यात आले. दुसऱ्या लाटेत अधिक संख्येने रुग्ण आढळून आल्याने, तसेच ऑक्सिजनचा तुटवडा जाणवल्याने ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारण्यावर भर देण्यात आला. जिल्ह्यात यापूर्वी एकही ऑक्सिजन निर्मिती प्लांट नव्हता. आता तीन प्लांट साकारले असून, आणखी दोन प्लांट साकारणार आहेत. वाशिम तालुक्यात सर्वाधिक सुविधाजिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वाशिम तालुक्यात सर्वाधिक आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरातील जिल्हा कोविड हॉस्पिटल येथे ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेडच्या संख्येत वाढ झाली. तीन ऑक्सिजन प्लांटही साकारले आहेत. याशिवाय दोन कोविड केअर सेंटरची सुविधा आहे.
जिल्ह्यात आरोग्य सेवेचे बळकटीकरण करण्यावर भर दिला जात आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरातील जिल्हा कोविड हॉस्पिटल येथे ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेडच्या संख्येत भर पडली आहे. तीन ऑक्सिजन प्लांट उभारले असून, आणखी काही प्लांट साकारले जाणार आहेत. तज्ज्ञ डॉक्टरही कंत्राटी तत्त्वावर घेण्यात आले आहेत. बालकांसाठी कोविड हॉस्पिटलमध्ये १२५ बेड तयार ठेवले आहेत.
- डॉ. मधुकर राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम.