लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग आॅगस्ट महिन्यात झपाट्याने वाढू लागला असतानाच रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तथापि, दिलासादायक बाब अशी की जिल्ह्यात २८ आॅगस्टपर्यंत १५६६ जणांना कोरोना संसर्ग झाला. त्यापैकी ११६१ रुग्णांनी कोरोनावर मात केली. अर्थात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७४.१३ टक्के आहे. विशेष म्हणजे जुलै अखेर जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या १६ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तर आॅगस्टमध्ये ही संख्या १४ ने वाढली असली तरी, मृत्यूदराचे प्रमाण मात्र २.६९ टक्क्यांहून घसरत आता १.९१ टक्क्यांवर आले आहे.जिल्ह्यात मेडशी येथे एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोरोना संसर्गाचा पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर पुढील जवळपास १५ दिवस जिल्हा कोरोना संसर्गाच्या संख्येत निरंकच होता; परंतु मे महिन्यापासून कोरोना संसर्गाचा प्रसार वाढू लागला. त्यात जुलै आणि आॅगस्ट महिन्यात कोरोना संसर्गाच्या रुग्णांत झपाट्याने वाढ झाली. रुग्णसंख्या वाढत असतानाच कोरोना संसर्गातून रुगण बरे होण्याचे प्रमाणही वाढले. तुलनेने आॅगस्ट महिन्यात रुग्ण बरे होण्याचा दर १० टक्क्यांनी वाढला. जुलै महिना अखेर जिल्ह्यात ५९४ कोरोनाबाधितांपैकी ३८६ रुग्णांनी कोरोनावर मात केली होती. यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६४.९८ टक्के होते, तर आॅगस्ट महिन्यात २७ तारखेपर्यंत १५६६ जणांना कोरोना संसर्गाची बाधा झाली. त्यात ११६१ जणांनी कोरोनावर मात केली. हे प्रमाण ७४.१३ टक्के आहे. जिल्ह्यातील एकूण १६ जणांचा ३१ जुलैपर्यंत कोरोना संसर्गाने मृत्यू झाला होता, तर आॅगस्टमध्ये ही संख्या १४ वाढली. तथापि, तुलनेने आॅगस्ट महिन्यात मृत्यूदराचे प्रमाणही घटले. जुलै अखेर कोरोना संसर्गाचा मृत्यूदर २.६९ टक्के होता, तर आॅगस्टमध्ये हे प्रमाण १.९१ टक्क्यांवर आले. ही बाब जिल्हावासियांसाठी मोठी दिलासा देणारी आहे.
रुग्णसंख्येत आॅगस्ट महिन्यात मोठी वाढजिल्ह्यात जुलै अखेरपर्यंत ५९४ जणांना कोरोना संसर्ग झाला होता. तर आॅगस्ट महिन्यात २९ जुलैपर्यंतच ही संख्या १५२८ वर पोहोचली. अर्थात आॅगस्ट महिन्यात २८ दिवसांतच जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर उपचार घेणाºया मिळून ९७२ जणांना कोरोना संसर्गाची बाधा झाल्याचे स्पष्ट होत आहे.