लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ब्रिटनहून रिसोड येथे एक महिन्यापूर्वी परतलेल्या एक जणाचा कोरोना चाचणी अहवाल २६ डिसेंबर रोजी पॉझिटिव्ह आला. खबरदारी म्हणून या रुग्णाचा पुन्हा स्वॅब घेवून तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाने २७ डिसेंबर रोजी स्पष्ट केले.सध्या ब्रिटनमधील काही भागांत कोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत काही बदल झालेला नवीन विषाणू आढळला आहे. या विषाणूचा प्रसार नेहमीपेक्षा अधिक वेगाने तसेच युवावर्गामध्ये जास्त प्रमाणात होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राज्यात २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या काळात ब्रिटनमधून जिल्ह्यात परतलेल्या प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण करण्यात येत आहे. ब्रिटनहून २८ नोव्हेंबर रोजी रिसोड येथे परतलेल्या एका जणाचा कोरोना चाचणी अहवाल २६ डिसेंबरला पॉझिटिव्ह आला. दरम्यान, या रुग्णामध्ये आढळून आलेला कोरोना विषाणू हा नेमका कोणत्या प्रकारातील आहे, हे स्पष्ट होण्यासाठी या रुग्णाचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात येणार आहेत. या रुग्णाला सध्या सरकारी कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले असून, लवकरच त्यांना खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये हलविण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. या रुग्णाच्या संपर्कातील अन्य दोन जणांनादेखील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून, त्यांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. ब्रिटनहून परतलेल्या एका जणाला कोरोना संसर्गाची लागण झाल्याने आरोग्य विभाग अलर्ट झाला असून, ब्रिटनहून परतलेल्या नागरिकांनी आरोग्य विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले.