शिरपूरपासून १६ किलोमीटर अंतरावर असलेल्या रिसोड तालुक्यातील गोवर्धना येथे मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. पाच-सहा दिवसांपूर्वी दोघा जणांचा कोरोना आजाराने मृत्यूसुद्धा झाला आहे. सुरवातीला कमी प्रमाणात निष्पन्न होत असलेल्या कोरोना रुग्णांमध्ये १४ एप्रिल रोजी एकदम मोठी वाढ झाली. १४ एप्रिल रोजी २१० कोरोना रुग्ण बाधित असल्याचे निष्पन्न झाले. शुक्रवार १६ एप्रिल रोजी पुन्हा २०७ रुग्ण निष्पन्न झाले तर शनिवार १७ एप्रिल रोजी ११५ रुग्ण आढळून आले. आता गोवर्धना येथील कोरोना रुग्णांची संख्या ६५० हून अधिक झाली आहे. त्यामुळे गोवर्धनासह परिसरातील नावली, मांगूळ झनक, शेलगाव राजगुरे, मसलापेन, केशवनगर या गावांतील नागरिकांमध्ये चिंता पसरली आहे. गोवर्धनासारख्या अति लहान गावामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण निष्पन्न होत असल्याने आरोग्य विभागासह प्रशासनावर मोठा ताण आला आहे. आरोग्य विभागाकडून नियमित कोरोना चाचणी करणे सुरू आहे. ३००० लोकसंख्या असलेल्या गोवर्धना येथील जवळपास २२०० नागरिकांची घरोघरी जाऊन चाचणी करण्यात आली.
तसेच गोवर्धना येथे आरोग्य विभागाकडून लसीकरणाचे कामसुद्धा सुरू आहे. तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसेवक, तलाठी, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा, पोलीस सतत गोवर्धना येथील परिस्थितीकडे लक्ष ठेवून आहेत. गोवर्धना येथील उर्वरित नागरिकांनी मनात भीती न बाळगता चाचणी करून घ्यावी, असे आवाहन रिसोडचे तहसीलदार अजित शेलार यांनी केले.