लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड : रिसोड तालुक्यातील चिखली येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळत असल्याने गावकऱ्यांची चिंता वाढली आहे. दरम्यान, कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक प्रशासन व आरोग्य विभागातर्फे प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोनाचे अधिक रुग्ण आढळलेला भाग हा प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येत आहे.
वर्षभर कोरोनाला वेशीवरच थोपवून धरलेल्या चिखली गावात एप्रिल २०२१मध्ये कोरोनाचा शिरकाव झाला. गावात जवळपास ४०पेक्षा अधिक रुग्ण आढळल्याने स्थानिक प्रशासनासह आरोग्य विभागही सावध झाला आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची चाचणी व तपासणी केली जात आहे. अधिक रुग्ण आढळलेला भाग हा प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. केंद्रीय पथकाने गावात भेट देऊन पाहणी केली. गावात निर्जंतुकीकरण करण्यात आले असून, ग्रामस्थांनीही अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, स्वत:बरोबरच इतरांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभाग व ग्रामपंचायतीने केले आहे. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना सवड येथील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले जात आहे. केंद्रीय चमूने गावाची पाहणी केली. यावेळी रिसोड तहसीलदार अजित शेलार यांच्यासह अधिकारी तसेच सरपंच मनिषा रमेश अंभोरे, पोलीसपाटील मंगेश सरनाईक, सामाजिक कार्यकर्ते रमेश अंभोरे, राजू नेहुल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.