लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन, प्रशासन कसोशीने प्रयत्न करीत असून, मास्कचा वापर न करणाऱ्याविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जात आहे, तर दुसरीकडे स्थानिक जिल्हा क्रीडासंकुल येथे आयोजित ‘आनंद मेला’त कोरोनाविषयक नियमांची ऐशीतैशी होत असल्याचे शुक्रवार, २२ जानेवारी रोजी रात्री ८ ते १० या वेळेत दिसून आले. रस्त्यावर कोरोनाविषयक नियमाची अंमलबजावणी होत असताना, ‘आनंद मेला’त सवलत कशासाठी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. देशात मार्च २०२० पासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. ऑक्टोबर महिन्यापासून कोरोनाचा आलेख खाली येत असून, कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार दिसून येत आहेत. दरम्यान, कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्कचा नियमित वापर, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासंदर्भात शासन, प्रशासनातर्फे जनजागृती, वेळप्रसंगी दंडात्मक कारवाईदेखील केली जात आहे. लॉकडाऊनचे नियम शिथिल झाले असले तरी कोरोनाविषयक नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे केले जाते. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी आहे. तसेच लग्नसमारंभात ५० पेक्षा अधिक व्यक्तींना परवानगी नाही. या सर्व नियमांना स्थानिक जिल्हा क्रीडासंकुल येथील ‘आनंद मेला’ अपवाद ठरत आहे. ‘आनंद मेला’त कोरोनाविषयक नियमांची अंमलबजावणी होते की नाही, यासंदर्भात २२ जानेवारी रोजी रात्री ८ ते १० या वेळेत रिअॅलिटी चेक केले असता, गंभीर बाबी समोर आल्या. प्रवेशद्वाराजवळ सॅनिटायझरची व्यवस्था आहे. आतमध्ये मात्र गर्दीचा उच्चांक दिसून आला. कोरोनाकाळातील हा गर्दीचा उच्चांक मानला जात आहे.अनेकजण मास्कचा वापर करीत नाहीत. तसेच फिजिकल डिस्टन्सिंग तर कुठेच आढळून आले नाही. यामुळे कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. मास्कचा वापर केला नाही तर दुचाकीचालकांना दंड ठोठावला जातो, मग ‘आनंद मेला’त या नियमांची अंमलबजावणी का नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. ‘नो मास्क, नो एन्ट्री’ नावालाच!आनंद मेला येथे ठिकठिकाणी ‘नो मास्क, नो एन्ट्री’ असे फलक लावण्यात आले आहेत. मात्र, याची अंमलबजावणी तेथे कार्यरत कामगारांकडून होत नसल्याचे दिसून आले. ‘नो मास्क, नो एन्ट्री’ असा फलक असलेल्या ठिकाणी कार्यरत कामगारच विनामास्क राहत असल्याने कोरोना विषाणू संसर्गाचा फैलाव झाला तर याला जबाबदार कोण? हा महत्वाचा प्रश्न आहे.
कोरोनाविषयक नियमांची अंमलबजावणी केली जाईल, या अटीवरच जिल्हा क्रीडासंकुल येथे ‘आनंद मेला’ला परवानगी दिली आहे. या अटी व नियमाचे उल्लंघन झाले तर परवानगी रद्द करण्यात येईल, अशा सूचनाही दिल्या. यासंदर्भात माहिती घेतली जाईल. - चंद्रकांत उप्पलवार जिल्हा क्रीडा अधिकारी, वाशिम
तहसील प्रशासनाकडून ‘आनंद मेला’साठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोनाविषयक नियमांची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. - विजय साळवेतहसीलदार, वाशिम