वाशिम : गतवर्षीप्रमाणेच यंदाच्या गणेशोत्सवावरही कोरोनाचे सावट असून, सार्वजनिक मंडळाकरिता श्रीगणेशाची मूर्ती ४ फूट व घरगुती गणपतीकरिता २ फूटाची अट कायम असल्याने गणेशभक्तांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
दरम्यान, कोरोाचा संसर्ग टाळण्यासाठी यंदाही गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचे आवाहन जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष शन्मुगराजन एस. यांनी केले. यासंदर्भात त्यांनी मंगळवारी मार्गदर्शक सूचना जारी केल्या.
सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांनी नगरपालिका/ नगरपंचायत/ स्थानिक प्रशासन यांची त्यांच्या धोरणानुसार पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. कोविड संसर्ग परिस्थितीचा विचार करता नगरपालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाने मंडपाबाबतचे धोरण यांचेशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावे. यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक गणपतीची सजावट करतांना त्यामध्ये भपकेबाजी नसावी. यावर्षी शक्यतो पारंपरिक गणेशमूर्ती ऐवजी घरातील धातू/संगमरवर आदी मूर्तीचे पूजन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले. गणेशोत्सवानिमित्त कोणतीही शिथिलता देता येणार नाही. आरती, भजन, कीर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही याची दक्षता घेऊन प्रदूषणासंदर्भातील नियमांचे व तरतुदींचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
०००००००००००००००
मूर्ती विसर्जनाबाबत काळजी घ्यावी
नगरपालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इत्यादीच्या मदतीने गणेश मूर्तीच्या विसर्जनाकरिता कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात यावी. मूर्ती शाडूची/ पर्यावरण पूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास जवळच्या कृत्रिम विसर्जनस्थळी विसर्जन करावे, असे आवाहनही प्रशासनाने केले. सांस्कृतिक कार्यक्रमाऐवजी आरोग्य विषयक उपक्रम/ शिबिरे आयोजित करण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहनही करण्यात आले.
००००००००००००
श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणुकीस मनाई
श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नये. विसर्जनाच्या पारंपरिक पध्दतीने विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जनस्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाणे टाळावे. या आदेशाचे पालन करण्याचे आवाहन जिल्हादंडाधिकारी शन्मुगराजन एस. यांनी केले.