भारतीय सण हे आपल्या समृद्ध परंपरेचे प्रतीक आहेत. हे सण आपल्यामध्ये एकोपा निर्माण करण्यास मदत करतात. भारतातील प्रत्येक सणाचे धार्मिक महत्त्व, पावित्र्य आणि इतिहास आहे. अशाच काही सणांपैकी एक म्हणजे गुढीपाडवा. गुढीपाडवा भारतामध्ये आणि प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. गुढीपाढवा हा चैत्र महिन्याची आणि हिंदू नववर्षाची सुरुवात करतो. महाराष्ट्रामध्ये घराबाहेर दारासमोर गुढी उभारून गुढीपाडवा साजरा केला जातो. चैत्र महिना भारतीय सौर पंचांगानुसार वर्षाचा पहिला महिना आहे. या महिन्याची सुरुवात चैत्र प्रतिपदेने होते. चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यांमध्ये उगादी, चेटी चांद अशा वेगवेगळ्या नावांनी आणि पद्धतींनी साजरा केला जातो. गुढीपाडव्याचा इतिहास हा समृद्ध आणि पवित्र मानला जातो. गुढीपाडवा साजरा करण्याची पध्दत अतिशय विलोभनीय आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी महाराष्ट्रामध्ये लोक आपल्या घराच्या प्रवेशद्वारासमोर गुढी उभारून हा दिवस साजरा करतात. गुढीभोवती रांगोळी काढली जाते आणि फुले वाहिली जातात. या दिवशी दागिने खरेदी, नवीन वाहन यासाठी चांगल्या कार्याची सुरुवात केली जाते. यंदा मात्र, कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने गुढीपाडवा साध्या पद्धतीने साजरा करावा लागणार आहे. गुढीपाडवा सणावर कोरोनाचे सावट असल्याने बाजारपेठेतही मंदीचे वातावरण असल्याचे दिसून येते.
गुढीपाडवा सणावर कोरोनाचे सावट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 4:39 AM