जिल्ह्यात एप्रिल २०२० पासून कोरोना विषाणू संसर्गाची बाधा होण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून डिसेंबर २०२० अखेर कोरोना रुग्णांचा आकडा सहा हजार ६६३ वर पोहोचला होता. दरम्यान, नव्या वर्षातील पहिल्या जानेवारी महिन्यात कोरोनाचे नवे ५०६ रुग्ण आढळले. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात हे प्रमाण काहीसे कमी होऊन १५० च्या आसपास रुग्णसंख्या झाली; मात्र १४ फेब्रुवारीपासून सातत्याने रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. १४ ते २० फेब्रुवारी या सात दिवसांत ३५८; तर २१ ते २७ फेब्रुवारी या सहाच दिवसांत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या तब्बल ८२७ ने वाढलेली आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा पूर्ण तयारीनिशी पुन्हा सज्ज झाली असून कुलूपबंद कोविड केअर सेंटरही सुरू झाले आहेत. कोरोनाबाधित रुग्णवाढीचा हा वेग यापुढील काही दिवस असाच कायम राहणार असल्याने नागरिकांनी कुठलाही धोका न पत्करता तोंडाला मास्क लावणे, सामाजिक व शारीरिक अंतर राखणे, स्वच्छतेचे निकष पाळून स्वत:सोबतच इतरांचेही कोरोनापासून रक्षण करावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
.................
बॉक्स :
एक नजर कोविड केअर सेंटरमधील कोरोना रुग्णसंख्येवर
स्त्री रुग्णालय, वाशिम - १७५
अनुसूचित जाती मुलींचे वसतिगृह, वाशिम - २३०
अनुसूचित जाती मुलांचे वसतिगृह, तुळजापूर - ११५
अनुसूचित जाती मुलांचे वसतिगृह, सवड - ९७
कारंजा उपजिल्हा रुग्णालय - ३५३
...............
कोट :
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. काही रुग्णांना गृहविलगीकरणात ठेवले जात असून आवश्यक त्याठिकाणी कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णभरती करून घेण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. कोरोनाचे संकट तीव्र होत असून नागरिकांनी सर्वतोपरी काळजी घेणे गरजेचे आहे.
- डॉ. अविनाश आहेर
जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम