वाशिम जिल्ह्यात गेल्या आठवडाभरात कोरोना संसर्गाच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली. त्यात १६ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारीदरम्यानच्या सात दिवसांत ४९६ लोकांना कोरोना संसर्ग असल्याचे निदान झाले आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून कोरोना चाचण्या वाढविण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. त्यात प्रामुख्याने रस्त्यांवरील फळविक्रेते, भाजीपाला विक्रेत्यांसह इतर व्यावसायिकांची चाचणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. आरोग्य विभागाने जिल्हाभरात ही मोहीम राबवित चार दिवसांतच पाच हजारांहून अधिक लोकांची चाचणी केली.
--------
बाधितांना ठेवले गृहविलगीकरणात
आरोग्य विभागाकडून राबविण्यात आलेल्या कोरोना चाचणी मोहिमेत सहा तालुक्यात मिळून १२० जणांना कोरोना संसर्ग असल्याचे निष्पन्न झाले. त्यांना गृहविलगीकरणात १४ दिवस राहण्याच्या सूचना देतानाच आरोग्य विभागाचे पथक त्यांच्यावर लक्ष ठेवून उपचार करीत आहेत.
-------------
कारंजात चौकाचौकात मोहीम
जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत कारंजा तालुक्यात मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण आढळून येत असल्याने तहसीलदारांनी तालुक्यात कोरोना चाचणीची मोहीमच राबविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार कारंजा शहरातील चौकाचौकात २२ फेब्रुवारीपासून कोरोना चाचणी केली जात आहे.
-------
कोट: जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार सार्वजनिक ठिकाणी फळविक्री आणि भाजीपाला विक्री करणाऱ्यांसह इतर व्यावसायिकांची कोरोना चाचणी केली जात आहे. यात बाधित आढळणाऱ्यांना आवश्यतेनुसार रुग्णालयात दाखल केले जात आहे किंवा गृहविलगीकरणात ठेवून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.
-डॉ. अविनाश आहेर
जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम
----------
चार दिवसांत झालेल्या चाचण्या
दिनांक चाचण्या बाधित
१९ फेब्रुवारी ५६० ०९
२० फेब्रुवारी ८०० १२
२१ फेब्रुवारी ९०० ५१
२१ फेब्रुवारी १०६४ ४९
------------------------------