कोरोना विषाणू संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सर्व खासगी आस्थापनाधारकांची कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली असून ११ मार्च ते २१ मार्च या कालावधीत आपली तसेच आस्थापनेत कार्यरत कामगारांची कोरोना चाचणी करून घ्यावी, अन्यथा २२ मार्चपासून आस्थापना बंद ठेवावी, असे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी १० मार्च रोजी निर्गमित केले आहेत.
दरम्यान, वाशिम शहरात युवा व्यापारी मंडळाने पुढाकार घेत स्थानिक जैन भवनात १२ मार्च रोजी तातडीने कोरोना चाचणी ‘कॅम्प’चे आयोजन करून सर्व व्यापाऱ्यांनी चाचणी करून घेण्याचे आवाहन केले. त्यास पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून ७० व्यापाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. पुढील दोन दिवसांत त्याचा अहवाल प्राप्त होणार आहे. रविवारीदेखील ‘कॅम्प’ सुरू राहणार असून उर्वरित व्यापाऱ्यांनी चाचणीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन युवा व्यापारी मंडळाचे जिल्हाध्यक्ष चरखा यांच्यासह सचिव भारत चांदनानी, संचालक महेंद्रसिंग गुलाटी यांनी केले आहे.
.....................
कोट :
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार २१ मार्चपर्यंत सर्व खासगी आस्थापनाधारक, दुकानदारांना कोरोना चाचणी करून घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे युवा व्यापारी मंडळाने पुढाकार घेऊन ‘कॅम्प’चे आयोजन केले. पहिल्याच दिवशी ७० व्यापाऱ्यांचे ‘थ्रोट स्वॅब’ घेण्यात आले असून पुढील दोन ते तीन दिवसांत सर्व व्यापाऱ्यांची कोरोना चाचणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट बाळगण्यात आले आहे.
- आनंद चरखा
जिल्हाध्यक्ष, युवा व्यापारी मंडळ, वाशिम