कोरोनाविषयक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिका-यांनी आरोग्य यंत्रणेची बैठक घेतली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांच्यासह ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी तसेच गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते.
आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये कोरोना बाधितांच्या संख्येत झालेली वाढ पाहता सर्वांनी आवश्यक खबरदारी घेणे आवश्यक आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर लवकरात लवकर उपचार सुरू झाल्यास रुग्ण बरा होण्याची शक्यता अधिक असते. याउलट अशा रुग्णाचे निदान होण्यास विलंब झाल्यास या बाधितांपासून त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना व इतर नागरिकांना संसर्ग होऊन कोरोनाचा फैलाव होऊ शकतो. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोना संसर्गाची लक्षणे दिसताच त्वरित नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा ग्रामीण रुग्णालयात जाऊन कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले.
०००००००००००
कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यावर भर
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कोरोना चाचण्यांची संख्या वाढवून कोरोनाबाधितांचा लवकरात लवकर शोध घेणे आवश्यक आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांना सर्दी, ताप, खोकला यासारखी लक्षणे असल्यास त्यांच्या घशातील स्रावाचे नमुने कोरोना चाचणीसाठी संकलित करावे. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयात घशातील स्राव नमुने संकलनाची व्यवस्था करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी दिल्या. तसेच ज्या कोरोनाबाधितांना गृह विलगीकरणमध्ये ठेवण्यात आले आहे, त्यांना आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार १४ दिवस निगराणीखाली ठेवावे, असे निर्देशही जिल्हाधिका-यांनी दिले.
००००००००००००००००००००००
आरोग्य केंद्रांतील सुविधांचा आढावा
ग्रामीण भागातील रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक उपकरणे व सामग्री असणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी सर्व ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक उपकरणे, सामग्रीचा आढावा घेतला.