वाशिम जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्याचा प्रयत्न म्हणून उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी प्रशासकीय यंत्रणेला दिल्या. भाजीपाला, फळे विक्रेत्यांना विकेंद्रित स्वरूपात जागा उपलब्ध करून देऊन एकाच ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना करावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. त्याअनुषंगाने वाशिम येथील पाटणी चौकातील भाजीबाजारासाठी विकेंद्रित स्वरूपात जागा उपलब्ध करून देण्यात आली. पाटणी चौकातील भाजीबाजार बंद केला असून, काटा रोड, लाखाळा रोड, कृषी उत्पन्न बाजार समिती आदी ठिकाणी विक्रेंद्रित स्वरूपात भाजीबाजार भरविण्यात आला. बाजार समिती आवारातील भाजीबाजाराला रविवारी उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत, तहसीलदार विजय साळवे, ठाणेदार ध्रूवास बावनकर यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी मास्क न वापरणाऱ्या काही विक्रेत्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली. दरम्यान, सावधगिरीचा उपाय म्हणून फेरीवाले, फळ व भाजीविक्रेत्यांचीदेखील कोरोना चाचणी केली जाणार आहे. यापुढे कोरोना चाचणी केल्याचे प्रमाणपत्र या विक्रेत्यांना सोबत बाळगावे लागणार आहे. कोरोना चाचणी न करणाऱ्यांना भाजीपाला, फळ व किरकोळ वस्तू विकता येणार नाहीत. वाशिम शहरातील फेरीवाले, फळ व भाजीपाला विक्रेत्यांनी कोरोना चाचणी करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार साळवे यांनी केले आहे.
फळ, भाजीपाला विक्रेत्यांचीही होणार कोरोना चाचणी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 4:30 AM