लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : दिवाळीच्या काळात अनेकजण दुसऱ्या गावांतून आपापल्या गावी परतले. संदिग्ध रुग्णांचा अपवाद वगळता इतरांची कोरोना चाचणी करण्यात आली नाही. १ ते १९ नोव्हेंबर या दरम्यान जवळपास दीड हजार जणांच्या तपासणी केल्या असून, २३५ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला.जिल्ह्यात पहिला कोरोना रुग्ण ३ एप्रिल रोजी मेडशी येथे आढळून आला होता. सप्टेंबर महिन्यापर्यंत जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू होता. या महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक वाढली. ऑक्टोबर महिन्यापासून कोरोनाचा आलेख खाली येत आहे. नोव्हेंबर महिन्यात यामध्ये आणखी घट येत असल्याचे दिसून येते. दरम्यान, दिवाळीदरम्यान अनेकजण बाहेरगावावरून आपापल्या गावी परतले. सध्या कोरोनाचा आलेख कमी असल्याने या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली नसून संदिग्ध किंवा सर्दी, ताप, खोकला व घसा दुखणे अशी लक्षणे असणाऱ्या रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली. दिवाळीदरम्यान अर्थात १ ते १८ नोव्हेंबर दरम्यान कोरोना चाचण्यांची संख्या गत महिन्याच्या तुलनेत फारशी कमी झाली नाही किंवा वाढलीदेखील नाही. रुग्णसंख्यादेखील स्थिर असल्याचे दिसून येते. तथापि, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता यापुढे संदिग्ध रुग्णांच्या चाचणी संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गत महिन्यात सुरूवातीच्या १८ दिवसात जवळपास १४६० कोरोना चाचण्यांची संख्या होती. या महिन्यात दीड हजाराच्या आसपास कोरोना चाचण्यांची संख्या आहे. दीड हजारापैकी २३५ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला.
संदिग्ध रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली. रुग्णसंख्या तुर्तास तरी स्थिर असल्याचे दिसून येते.-डाॅ. मधुकर राठोड जिल्हा शल्य चिकीत्सक